मुंबईत पुन्हा विद्यार्थ्यांचा एल्गार! 9 ऑगस्टला क्रांती दिनी भव्य विद्यार्थी मोर्चा
मुंबई (प्रतिनिधी) : दिल्लीतील नीट पेपरफुटी आंदोलनानंतर देशभरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना नवी दिशा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. आता या आंदोलनाची पुढची पायरी मुंबईत दिसणार असून, 9 ऑगस्ट क्रांती दिनी विविध विद्यार्थी संघटना एकत्र येत भव्य विद्यार्थी रॅली काढणार आहेत.

या आंदोलनात नीट परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरण, एमपीएससी विद्यार्थ्यांचे प्रश्न, मराठी शाळांची स्थिती आणि शिक्षणाशी संबंधित इतर अनेक मुद्दे उपस्थित केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
विद्यार्थी संघटनांच्या मते, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी केवळ राजकीय पक्षांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. विद्यार्थी स्वतः एकत्र येऊनही प्रभावीपणे लढा देऊ शकतात, हा विश्वास या चळवळीतून अधिक बळकट झाला आहे.
या आंदोलनात कॉकरोच जनता पार्टी (CJP), छात्र भारती, AISF, SFI यांसह विविध विद्यार्थी संघटना सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यभरातील तसेच देशातील विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनानंतर शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेवरील चर्चेला वेग आला असून, आता मुंबईतील 9 ऑगस्टची ही रॅली विद्यार्थ्यांच्या पुढील लढ्याची महत्त्वाची पायरी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




