E20 जनता पार्टी म्हणजे नेमकं काय? कोण चालवतं अभियान आणि काय आहेत प्रमुख मागण्या?

E20 जनता पार्टी म्हणजे नेमकं काय? कोण चालवतं अभियान आणि काय आहेत प्रमुख मागण्या?

मुंबई (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर सध्या E20 जनता पार्टी नावाचं एक नागरिक अभियान वेगाने चर्चेत येत आहे. हे कोणतंही नोंदणीकृत राजकीय पक्ष नसून, इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करणारी एक डिजिटल मोहीम असल्याचं या अभियानाचं म्हणणं आहे.

या अभियानाची प्रमुख मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबत 100% शुद्ध (इथेनॉल-फ्री) पेट्रोलचाही पर्याय उपलब्ध करून द्यावा. सरकारने E20 ला प्रोत्साहन द्यावं, याला त्यांचा विरोध नसल्याचं सांगत, ग्राहकांना आपल्या गरजेनुसार इंधन निवडण्याचा अधिकार मिळावा, अशी भूमिका या अभियानाने मांडली आहे.

'X' आणि इन्स्टाग्रामवर सुरू झालेल्या या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून, मीम्स, व्यंग्य आणि माहितीपूर्ण पोस्टच्या माध्यमातून अनेक वाहनचालक या अभियानाशी जोडले जात आहेत. अभियानाच्या पोस्टमध्ये, "आमची वाहने कोणतीही प्रयोगशाळा नाहीत. आम्हाला योग्य पर्याय आणि पारदर्शक धोरण हवं," अशी भूमिका मांडण्यात आली आहे.

या अभियानाच्या सोशल मीडिया हँडलवर स्पष्ट करण्यात आलं आहे की, त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा विचारसरणीशी संबंध नाही. ग्राहकांचे हक्क, धोरणांमध्ये पारदर्शकता आणि E20 धोरणावर खुली सार्वजनिक चर्चा व्हावी, हा या मोहिमेचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.

सोशल मीडियावर या अभियानाची तुलना कॉकरोच जनता पार्टी या पूर्वी चर्चेत आलेल्या व्यंगात्मक मोहिमेशीही केली जात आहे. मात्र,E20 जनता पार्टीच्या संस्थापकांविषयी किंवा हे अभियान नेमकं कोण चालवत आहे, याची अधिकृत माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या हे एक सोशल मीडिया-आधारित नागरिक अभियान म्हणूनच ओळखलं जात आहे.