उपसभापतीपदासाठी मोठा ट्विस्ट! नीलम गोऱ्हे की शिंदेंचा नवा चेहरा?

उपसभापतीपदासाठी मोठा ट्विस्ट! नीलम गोऱ्हे की शिंदेंचा नवा चेहरा?

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अखेर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, आता सर्वांच्या नजरा एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्जांची छाननी त्याच दिवशी होईल आणि गरज भासल्यास 1 जुलै रोजी दुपारी 1 वाजता मतदान होणार आहे. मात्र, निवडणूक बिनविरोध झाली तर त्याच दिवशी नव्या उपसभापतींची घोषणा होऊ शकते.

महायुतीतील सत्तावाटपाच्या सूत्रानुसार हे पद पुन्हा एकदा शिवसेनेच्या शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या पदासाठी पक्षात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.माजी उपसभापती नीलम गोऱ्हे या पुन्हा एकदा सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. नुकत्याच त्या विधान परिषदेत बिनविरोध निवडून आल्यामुळे त्यांचं नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे.

मात्र, राजकीय वर्तुळात आणखी काही नावांचीही जोरदार चर्चा सुरू आहे. कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी आणि मनीषा कायंदे यांनाही संधी मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे शेवटच्या क्षणी नवा चेहरा पुढे करून सर्वांनाच धक्का देण्याच्या भूमिकेत असू शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहणार आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे विरोधक उमेदवार उभा करणार की निवडणूक बिनविरोध होणार, याकडेही लक्ष लागलं आहे.आता 30 जूनला कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि 1 जुलैला उपसभापतीपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे.