लाखो रुपयांना विकल्या चिंचेच्या बिया अन् 'दैवी मध'! भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ईडीकडून धक्कादायक खुलासे

लाखो रुपयांना विकल्या चिंचेच्या बिया अन् 'दैवी मध'! भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात ईडीकडून धक्कादायक खुलासे

 मुंबई : 'दैवी शक्ती' आणि चमत्कारांचे आश्वासन देऊन भक्तांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) न्यायालयात नवे आणि धक्कादायक पुरावे सादर केले आहेत. भक्तांचे आर्थिक संकट दूर करण्याचे आणि व्यवसायात भरभराट आणण्याचे दावे करत अशोक खरातने अत्यंत किरकोळ वस्तू लाखो रुपयांना विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

भोंदूबाबा अशोक खरातच्या फसवणुकीचे कारनामे:

  • १ हजारांची अंगठी २.६२ लाखांना: अवघ्या १ हजार रुपये किमतीच्या पुष्कराज आणि डायमंडसदृश अंगठ्यांची जोडी भक्तांना तब्बल २ लाख ६२ हजार रुपयांना विकली गेली. जप्त केलेल्या अंगठ्यांचे मूल्यांकन केले असता त्या साध्या नकली दागिन्यांच्या स्वरूपातील असल्याचे समोर आले.
  • चिंचेच्या बिया १ लाखाला: बाजारात १०० रुपये प्रति किलो मिळणाऱ्या चिंचेच्या बिया 'अद्भूत शक्ती'चे कारण सांगून १० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत विकल्या गेल्या.
  • ७ लाख रुपये लिटरने 'दैवी मध': ३०० ते ५०० रुपये प्रति लिटर दराचा साधा मध 'दैवी मध' म्हणून तब्बल ७ लाख रुपये प्रति लिटर या दराने भक्तांच्या माथी मारला गेला.
  • साधी रत्ने लाखो रुपयांत: सामान्य रत्नांना ग्रहदोष दूर करणारी आणि यश मिळवून देणारी 'ऊर्जित' रत्ने म्हणून लाखो रुपयांना विकण्यात आले.

मनी लॉन्ड्रिंग आणि संघटित गुन्हा

या फसवणुकीतून जमा झालेला पैसा विविध बँक खात्यांमध्ये फिरवून त्याचा मूळ स्रोत लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये ईडीने हा प्रकार 'संघटित आर्थिक फसवणुकीचा' (Organized Financial Fraud) भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.

लैंगिक शोषण अन् पतसंस्था घोटाळा

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शाखेत बोगस खाती उघडून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी यापूर्वीच अशोक खरातला अटक केली होती. या प्रकरणात त्याला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय, भोंदूबाबा अशोक खरातविरुद्ध महिलांच्या लैंगिक शोषणाचे तब्बल आठ गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आता ईडीच्या विशेष पथकाने त्याचा ताबा घेतला आहे.