वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीनंतर आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार; नेमकं प्रकरण काय?

वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीनंतर आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार; नेमकं प्रकरण काय?

मुंबई (प्रतिनिधी) : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी कॉकरोच जनता पार्टी चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. दिपके यांच्या समर्थकांनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप करत त्यांनी तातडीने कारवाई आणि अटकेची मागणी केली आहे.

फैजान अन्सारी यांनी सांगितलं की, मी दिल्ली डीसीपींकडे लेखी तक्रार दिली आहे. अभिजीत दिपके यांच्या माणसांनी माझ्यावर हल्ला केल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील मारहाणीच्या प्रकरणात आधीच दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे दिपके यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी दिल्ली पोलिसांचे कौतुक करत, सोनम वांगचुक यांना योग्य वेळी ताब्यात घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिल्याचंही म्हटलं. तसेच, दिपके हे सर्व काही स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.दरम्यान, याआधी आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केलं होतं.

दिपके म्हणाले होते, पंतप्रधानांनी आधी त्यांची पदवी सार्वजनिक करावी. त्यानंतर मी माझ्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा आणि शैक्षणिक खर्चाचा संपूर्ण तपशील जाहीर करेन. माझी पदवी खरी आहे आणि पंतप्रधानांचीही खरी असेल, अशी अपेक्षा आहे.आता या नव्या पोलिस तक्रारीनंतर अभिजीत दिपके पुन्हा एकदा चर्चेत आले असून, या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.