सुनेत्रा पवारांना ‘गुंगी गुडिया’ म्हणत काँग्रेसची टीका; राष्ट्रवादीसह शिंदेंचा पलटवार
मुंबई (प्रतिनिधी) : बीड दौऱ्यातील एका व्हिडिओवरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आमदार धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ काँग्रेसने शेअर करत सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली आहे.सुनेत्रा पवार शांत बसलेल्या दिसत आहेत. यावरून काँग्रेसने सुनेत्रा पवार अजून किती दिवस 'गुंगी गुडिया' बनून राहणार? असा सवाल करत निशाणा साधला.

काँग्रेसच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस लोकांपासून दूर गेली आहे, त्यामुळे अशी विधानं केली जात आहेत. इंदिरा गांधींवरही अशाच प्रकारच्या टीका झाल्या होत्या आणि त्यानंतर त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या, असा पलटवार राष्ट्रवादीकडून करण्यात आला.
राष्ट्रवादी नेते सूरज चव्हाण यांनीही काँग्रेसवर टीका करत, सुनेत्रा पवार नियमितपणे पत्रकारांशी संवाद साधतात आणि बीडमधील पत्रकार परिषदेतही त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली होती, असं सांगितलं.
या वादात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही काँग्रेसच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. एका महिला उपमुख्यमंत्र्यांसाठी अशी भाषा वापरणं चुकीचं आहे. मी राष्ट्रवादीविरोधात लढले असले तरी सुनेत्रा पवारांबद्दल वापरलेले शब्द अयोग्य आहेत, असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने असे शब्द वापरताना जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी. लाडक्या बहिणींनी याचं उत्तर दिलं आहे, असा पलटवार त्यांनी केला.
सुनेत्रा पवार यांच्यावरील या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनीही काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे ‘गुंगी गुडिया’ या वक्तव्यावरून आता महायुती आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.




