साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन; 15 ऑक्टोबरपासून गळीत हंगाम? राजू शेट्टींचा विरोध

साखरेचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन; 15 ऑक्टोबरपासून गळीत हंगाम? राजू शेट्टींचा विरोध

मुंबई (प्रतिनिधी) : साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार यंदाचा ऊस गळीत हंगाम लवकर सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत 9 सप्टेंबर रोजी मंत्री समितीची महत्त्वाची बैठक होणार असून, त्यामध्ये गळीत हंगामाच्या तारखेवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

साधारणपणे ऊस गळीत हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. मात्र, साखरेचं कमी झालेलं उत्पादन आणि वाढलेले दर पाहता यंदा 15 ऑक्टोबरपासूनच हंगाम सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला साखर कारखानदारांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विरोध केला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय गळीत हंगाम सुरू करू देणार नसल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

हंगाम लवकर सुरू केल्यास उसाच्या उताऱ्यावर परिणाम होऊन एक ते दीड टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्याचं प्रति टन सुमारे 600 रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता असल्याचा दावा राजू शेट्टी यांनी केला आहे. तसंच, लवकर गळीत हंगाम सुरू केल्यास देशातील साखर उत्पादनात 30 ते 35 लाख टनांची घट होऊ शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे साखरेचे दर नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार काय निर्णय घेतं, याकडे आता लक्ष लागलं आहे.