दारूच्या नशेत घरासमोर संशयास्पद हालचाल; पर्यटकाला बेदम मारहाण

दारूच्या नशेत घरासमोर संशयास्पद हालचाल; पर्यटकाला बेदम मारहाण

सातारा (प्रतिनिधी) : निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी परिसरात आलेल्या एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे घरासमोर संशयास्पद हालचाल केल्याच्या आरोपावरून भिगवण येथील 24 वर्षीय अक्षय रमेश जाधव याला लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी मुख्य संशयितासह वाई परिसरातील चार जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय जाधव हा आपल्या मित्रांसोबत पाचगणी परिसरात फिरण्यासाठी आला होता. भोसे येथील एका लॉजवर ते मुक्कामाला होते. अक्षय हा मद्याच्या नशेत असल्याने मित्रांनी त्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने खोलीतच थांबवून ठेवले होते. मात्र काही वेळानंतर त्याने खोलीचा दरवाजा उघडून बाहेर धाव घेतली. त्यानंतर तो शेजारील एका घराजवळ गेला आणि घरात डोकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला.

घरासमोर अनोळखी व्यक्ती आल्याचे पाहून संबंधित कुटुंबीय संतप्त झाले. त्यांनी अक्षयला पकडून त्याला लाकडी दांडके तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान तो चिखलात कोसळला आणि गंभीर जखमी झाला.घटनेची माहिती मिळताच मित्रांनी अक्षयला तातडीने उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पाचगणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत मुख्य संशयित सूर्यकांत गोळे याच्यासह इतर तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, नेमकी घटना कोणत्या परिस्थितीत घडली याचा शोध पोलीस घेत आहेत.