भाजप आमदार राजकारणातून एक्झिट होण्याच्या वाटेवर

भाजप आमदार राजकारणातून एक्झिट होण्याच्या वाटेवर

मुंबई - विधान परिषदेचे सदस्य आ. संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात त्यांनी सविस्तर पत्र लिहून आपला निर्णय जाहीर केला आहे. आ. जोशी यांची विधान परिषदेतील मुदत 13 मे रोजी संपुष्टात येत असून, त्यानंतर कोणतेही पद न स्वीकारता ते राजकारणातून पूर्णतः बाजूला होणार आहेत.

आपल्या पत्रात आ. संदीप जोशी यांनी स्पष्ट केले आहे की, राजकारण हे त्यांच्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा समाजसेवेचे माध्यम राहिले आहे. मात्र सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा यामुळे सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कोणीच थांबायला तयार नाही, ही आजची वस्तुस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले.

आ. संदीप जोशी पुढे म्हणाले, “आजही मी स्वतः ला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो. मात्र सध्याचे चित्र पाहता आपणच थांबावे, हा विचार पक्का होत गेला,” असे आ. जोशी यांनी पत्रात म्हटले आहे. वयाची 55 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तरुण पिढीसाठी जागा मोकळी करणे आवश्यक असल्याची भूमिका घेत त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीला पूर्णविराम देत असल्याचे जाहीर केले.

भाजपने आपल्याला घडवले, मोठे केले, याची जाणीव असल्याचे सांगत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून हा निर्णय जाहीर केला. 13 मेपर्यंत आमदार म्हणून असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये पूर्ण जबाबदारीने पार पाडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत आमदारकी स्वीकारणार नसून, ती संधी पक्षाने एखाद्या तरुण किंवा सामान्य कार्यकर्त्याला द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नसून सखोल विचारांती घेतलेला असल्याचे सांगत, यापुढे आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाजसेवेत सक्रिय राहणार असल्याचे आमदार जोशी यांनी नमूद केले. कोरोनाच्या काळात सुरू केलेले ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, गोसेवा प्रकल्प, तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा संस्थांमधील जबाबदाऱ्या पुढेही ते प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीने दिलेल्या संधींबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर आणि विधान परिषदेचे सदस्य अशी जबाबदारी देऊन सन्मान केल्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले. माझ्या असण्यामुळे कोणत्याही सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, हा विचारच आपल्या निर्णयामागे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.