बिग बॉस मराठी दुसऱ्या आठवड्याची स्फोटक सुरुवात ; शांत राकेश बापट संतापला अन्...

बिग बॉस मराठी दुसऱ्या आठवड्याची स्फोटक सुरुवात ; शांत राकेश बापट संतापला अन्...

मुंबई - ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जोरदार वादाची ठिणगी पडली आहे. नेहमी संयमी आणि शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा अभिनेता राकेश बापट यावेळी चांगलाच संतापलेला पाहायला मिळतोय. या घटनेचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हिंदी आणि ओटीटी बिग बॉसमध्ये आपली छाप उमटवणारा राकेश बापट त्याच्या ‘चिल’ स्वभावासाठी कायम चर्चेत राहिला आहे. मात्र बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात पहिल्या आठवड्यात शांत दिसलेला राकेश दुसऱ्या आठवड्यात अचानक आक्रमक अवतारात दिसून आला. वाहिनीनं शेअर केलेल्या प्रोमोनुसार, अनुश्री मानेच्या काही वागण्या - बोलण्यामुळे राकेशचा संयम सुटल्याचं स्पष्ट होत आहे.

घरातील बेडवरून सुरू झालेला हा वाद पाहता पाहता टोकाला गेला. अनुश्रीच्या काही वक्तव्यांमुळे राकेश प्रचंड चिडला आणि तिला कडक शब्दांत सुनावलं. या गोंधळात इतर घरातील सदस्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र राकेशचा संताप काही केल्या कमी होताना दिसत नाही. वाद अधिक चिघळला तेव्हा अनुश्री म्हणाली, “मला कोणीही माझ्या बेडवरून हलवू शकत नाही.” पुढे ती राकेशला उद्देशून म्हणाली, “जिथं तू हात धरून मला उठवलंस, तिथंच तू माझ्या डोक्यात गेलास.” हे ऐकताच राकेशचा पारा चढला. तो संतप्त स्वरात म्हणाला, “हे बोलणं चुकीचं आहे. पुन्हा असं बोलायची हिंमत करू नको.”

https://www.instagram.com/reel/DTrlXxqiKb_/?utm_source=ig_web_copy_link

यानंतर राकेशने आपल्या कामाचा उल्लेख करत ठामपणे सांगितलं, “मी आयुष्यात २५ वर्षं काम केलं आहे. मला असं बोलायची कोणाचीही हिंमत नाही.” वाद इतका वाढला की रागाच्या भरात राकेश ओरडत म्हणाला, “मला आता या घरात थांबायचं नाहीये!” आणि तो तिथून निघून गेला.

आता हा वाद शांत होणार की राकेश खरंच घर सोडण्याचा निर्णय घेणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. पुढील भागात नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.