बांधकाम कामगारांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा; मृत्यूनंतर कुटुंबाला साडेसहा लाखांपर्यंत आर्थिक मदत

बांधकाम कामगारांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा; मृत्यूनंतर कुटुंबाला साडेसहा लाखांपर्यंत आर्थिक मदत

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील बांधकाम कामगारांसाठी फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला अधिक आर्थिक आधार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, याबाबत कामगार विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.

या निर्णयानुसार, नैसर्गिक मृत्यू झाल्यास कामगाराच्या कुटुंबाला ३ लाख ५० हजार रुपये, तर अपघाती मृत्यू झाल्यास ६ लाख ५० हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तसेच, कामगाराला कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास २ लाख रुपयांची मदत देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. अपघात किंवा मृत्यूनंतर संबंधित कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, यासाठी मदतीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय, नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी निवृत्तीनंतर वेतनासारखी योजना आणि महिला कामगारांना मातृत्व लाभ देण्याचाही निर्णय सरकार घेत आहे.

फुंडकर यांनी सांगितले की, या सर्व योजनांचा लाभ फक्त बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत कामगारांनाच मिळणार आहे. नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रांबाबतही सरकारने काही नियमांमध्ये बदल केले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करताना 'कामगार हिताला सर्वोच्च प्राधान्य' देण्याचे निर्देश दिले आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अधिक प्रभावी योजना, माथाडी आणि बांधकाम कामगारांच्या सदस्यत्वाबाबत स्पष्ट नियम, तसेच नवीन केंद्रीय कामगार कायद्यांशी सुसंगत सुधारणा करण्यावर सरकार भर देत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.