मराठीच्या सक्तीमुळे ऑटो-टॅक्सी चालकांचा मार्ग बदलला; कारवाईविरोधात हायकोर्टात जाण्याची तयारी
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत व्यवहारिक मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर सध्या कारवाई सुरू आहे. मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाकडून मराठी भाषा न येणाऱ्या चालकांवर कारवाई केली जात असून, काही चालकांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. याचदरम्यान, मराठी येते की नाही, या तपासणीपासून बचाव करण्यासाठी काही ऑटो-टॅक्सी चालकांनी रेल्वे स्थानक, मॉल आणि प्रमुख मार्ग टाळण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

RTO तपासणीची माहिती देण्यासाठी चालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज व्हायरल होत आहेत. काही चालकांनी सेवा तात्पुरती बंद केली, तर काहींनी आपली वाहने MMR बाहेर नेल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मुंबईतील काही भागांत ऑटो-टॅक्सीची कमतरता जाणवत असल्याचा दावा युनियनने केला आहे. मराठी शिकण्यासाठी पुरेशा सुविधा नसताना शो-कॉज नोटीस बजावण्यात आल्याचा चालकांचा आक्षेप आहे. नोटीस बजावलेल्या चालकांचा गट हायकोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. राज्यभर गेल्या चार दिवसांत 2,500 हून अधिक चालकांना नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरातही या कारवाईविरोधात काही परप्रांतीय रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. परिवहन विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात अमराठी रिक्षा चालकांनी कांदिवली पश्चिम लिंक रोड परिसरात संप पुकारला. अचानक रिक्षा बंद झाल्यामुळे कामासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. पोलिसांनी घटनास्थळी मध्यस्थी करत रिक्षा सुरू करण्याचे आवाहन केले. मात्र, परिवहन विभागाच्या कारवाईची भीती असल्याने चालकांनी रिक्षा बंद ठेवली.
महाराष्ट्रात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या चालकांना प्रवाशांशी प्रभावीपणे संवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनुसार मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकाच्या वाहन चालविण्याच्या परवान्यावरील संबंधित अधिकृतता निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
शासनाच्या अधिसूचनेनुसार Maharashtra Motor Vehicles (Amendment) Rules, 2026 अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 मध्ये विविध बदल करण्यात आले आहेत. यामध्ये रिक्षा, टॅक्सी तसेच इलेक्ट्रॉनिक मीटर असलेल्या ॲप-आधारित मोटार कॅबच्या चालक आणि परमिटधारकांसाठी व्यवहारिक मराठी भाषेच्या ज्ञानाची अट स्पष्ट करण्यात आली आहे.
दरम्यान, मुंबईसह एमएमआर रिजनमध्ये पुढील महिन्यापासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार आहे. भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRTA ची मंजुरी मिळाली असून, 1 सप्टेंबर 2026 पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई, विरार आणि पालघर या भागांत नवीन भाडे लागू होणार आहे.
20 ऑगस्ट रोजी परिवहन आयुक्तांनी पाठवलेला भाडेवाढीचा प्रस्ताव MMRTA ने मंजूर केला. याआधी फेब्रुवारी 2025 मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती. इंधन, वाहनांची देखभाल-दुरुस्ती, विमा हप्ते आणि परवाना-संबंधित खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन ही भाडेवाढ प्रस्तावित करण्यात आली होती.




