नितीन गडकरींना दिलासा, मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; नव्या 'E20 जनता पार्टी'चीही एन्ट्री
मुंबई (प्रतिनिधी) : इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच E20 इंधनाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. सोशल मीडियावर डीपफेक, एआय व्हिडिओ आणि आक्षेपार्ह पोस्टच्या माध्यमातून बदनामीकारक मजकूर पसरवल्याचा दावा करत गडकरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, नितीन गडकरी हे मेटा, गुगल आणि एक्ससारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरोधात दिवाणी खटला दाखल करू शकतात. E20 धोरणाबाबत पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीविरोधात कायदेशीर मार्ग स्वीकारण्याचा अधिकार त्यांना असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या निर्णयावरून सोशल मीडियावर नितीन गडकरींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. काही जणांनी या धोरणाचा वाहनांवर परिणाम होत असल्याचा दावा केला आहे, तर सरकारकडून इथेनॉल मिश्रणाचे फायदे सांगितले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर 'E20 जनता पार्टी' नावाच्या नव्या डिजिटल अभियानाची चर्चा सुरू झाली आहे. हे कोणतेही अधिकृत राजकीय पक्ष नसून, E20 पेट्रोलबाबत ग्राहकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे अभियान असल्याचे सांगितले जात आहे.
या अभियानाची प्रमुख मागणी म्हणजे प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबत 100 टक्के शुद्ध पेट्रोलचा पर्यायही उपलब्ध करून द्यावा. ग्राहकांना आपल्या वाहनानुसार इंधन निवडण्याचा अधिकार मिळावा, अशी या मोहिमेची भूमिका आहे.
E20 पेट्रोलचा मुद्दा, सोशल मीडिया वाद आणि न्यायालयीन निर्णयामुळे इंधन धोरणावरची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.




