MPSC पेपरफुटीची पहिली तक्रार देणारे ऋषिकेश गांगर्डे आता नवा धमाका करणार; 1 सप्टेंबरला नवे पुरावे देणार

MPSC पेपरफुटीची पहिली तक्रार देणारे ऋषिकेश गांगर्डे आता नवा धमाका करणार; 1 सप्टेंबरला नवे पुरावे देणार

मुंबई (प्रतिनिधी) : अन्न, औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेली संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. तर एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक झाली असून या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. दुसरीकडे याच मुद्द्यावरून राज्याचं राजकारण तापलं असताना या प्रकरणातील पॉलिटिकल कनेक्शनही समोर येताना दिसत आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर आली आहे. MPSC पेपरफुटीची पहिली तक्रार देणारे ऋषिकेश गांगर्डे पुन्हा एकदा नवे पुरावे देणार असल्याची माहिती समोर आली आहे. 1 सप्टेंबरला ते यासंदर्भातील पुरावे देत मोठा खुलासा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांनी केला होता. सुरुवातीला आयोगाने हे आरोप फेटाळून लावले होते. त्यासोबतच मानहानीचा गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, आता या प्रकरणात जवळपास सहा जणांना अटक झाली असून पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

याबाबत ऋषिकेश गांगर्डे यांना विचारलं असता ते म्हणाले की, माझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची भाषा करणाऱ्यांनी आता हे आरोप स्वीकारले असून कारवाईही केली आहे. त्यामुळे त्यांच्यामुळेच आयोगाची प्रतिमा मलीन झाली असल्याने आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सोबतच पुनर्परीक्षा जरी होणार असली, तरी पुन्हा पेपर फुटणार नाही, याची शाश्वती कोण देणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही ज्यांच्याकडे पेपर फुटल्याचे पुरावे दिले होते, त्यांनाच अटक झाल्याने त्यांनी ते पुरावे आता नष्ट केले असतील, अशी शंकाही गांगर्डे यांनी व्यक्त केली आहे.

यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भाजप नेत्यांच्या मुलांना या पेपरफुटीचा फायदा झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत 1 सप्टेंबरला आपण जाहीरपणे सर्व पुरावे सादर करणार असल्याचं ऋषिकेश गांगर्डे यांनी म्हटलं आहे.