उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे प्रभारी झाल्यानंतर विनोद तावडे पहिल्यांदाच लखनौमध्ये; 'मिशन 2027'साठी आखली रणनीती
मुंबई (प्रतिनिधी) : भाजपने उत्तर प्रदेशात सत्तेची हॅटट्रिक साधण्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे. दोन दिवसीय लखनौ दौऱ्यावर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी विनोद तावडे यांनी ‘मिशन 2027’साठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशचे प्रभारी झाल्यानंतर पहिल्यांदाच लखनौमध्ये दाखल झालेल्या विनोद तावडे यांनी संघटना मजबूत करण्यापासून ते आगामी प्रचाराची दिशा ठरवण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केलं.

दोन दिवसांच्या दौऱ्यात विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. यासोबतच पक्षाच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आगामी निवडणुकीचा आराखडा तयार केला.
2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लक्ष्य देताना तावडे यांनी प्रत्येक बूथ मजबूत करण्यावर भर दिला. कोणताही बूथ दुर्लक्षित राहता कामा नये आणि प्रत्येक बूथसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
तसंच, समाजातील सर्व जातींना सोबत घेण्याचा मंत्रही त्यांनी दिला. एखाद्या जातीची संख्या कमी असली तरी त्या समाजाला वगळता कामा नये, असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वयासाठी वापरलेला एनडीएचा यशस्वी फॉर्म्युला उत्तर प्रदेशातही लागू करण्याची तयारी विनोद तावडे यांनी सुरू केली आहे.
2027 ची विधानसभा निवडणूक मजबूत संघटनेच्या बळावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावावर आणि सरकारच्या कामाच्या जोरावर लढण्याचे संकेत तावडे यांनी दिले आहेत. सरकार आणि संघटना यांच्यात योग्य समन्वय ठेवून आगामी निवडणुकीची तयारी करण्याचा आराखडा त्यांनी मांडला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर तावडे यांनी दिवसभर पक्षाच्या कार्यालयात विविध पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. राज्य सरचिटणीस, प्रादेशिक अध्यक्ष आणि प्रभारी यांच्यासोबतही त्यांनी चर्चा केली.
भाजपच्या संघटनात्मक नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं की, 2027 च्या निवडणुकीतील विजयाचा मजबूत पाया हा बूथ पातळीवरील संघटन असेल. प्रत्येक बूथसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक बूथवरील पक्षाच्या कामगिरीचा आणि विजयाच्या टक्केवारीचा आढावा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
ज्या बूथवर पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही, अशा ठिकाणच्या त्रुटी दूर करण्यावरही भर देण्यात आला. विशेषतः पराभूत बूथ ओळखून तिथे पक्षाची संघटना आणखी मजबूत करण्याचे निर्देश तावडे यांनी दिले. दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या ‘PDA’ म्हणजेच मागास, दलित आणि अल्पसंख्याक या समीकरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनेही तयारी सुरू केल्याचं दिसत आहे.
याबाबत तावडे यांनी समाजातील प्रत्येक घटकाचा पाठिंबा भाजपला आवश्यक असल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेश हे मोठं राज्य असून प्रत्येक भागात वेगवेगळ्या जातींचा प्रभाव आहे. त्यामुळे कोणतीही जात पक्षाच्या संपर्कातून बाहेर राहता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. एखाद्या विशिष्ट जातीच्या मतदारांची संख्या कमी असली तरी त्यांना दुर्लक्षित न करता त्यांच्याशी संपर्क वाढवून पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असंही तावडे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
तसंच, विरोधकांच्या तयारीवर बारकाईने लक्ष ठेवून त्यानुसार भाजपची रणनीती ठरवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. त्यामुळे 2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच बूथ मजबूत करण्यापासून ते सर्व समाजघटकांना सोबत घेण्यापर्यंतची रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचं स्पष्ट होत आहे.




