नवी मुंबईत ‘हिंदी’ राजभाषा संमेलनाचं आयोजन; अमित शाहांची प्रमुख उपस्थिती, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

नवी मुंबईत ‘हिंदी’ राजभाषा संमेलनाचं आयोजन; अमित शाहांची प्रमुख उपस्थिती, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मराठीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिरवला. देवेंद्र फडणवीस यांनी मराठी शिकण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचालकांना एक वर्षांची मुदतवाढ दिली आहे.रिक्षा-टॅक्सीचालकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मराठी शिकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. ही मागणी मान्य करत देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षांची मुदतवाढ दिली.

तर या निर्णयाविरोधात मनसे कोर्टात जाणार असल्याची माहिती आहे. अमराठी चालकांना चुकीच्या पद्धतीने बॅच आणि परवाने दिल्याचा मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय यांचा आरोप आहे. एकीकडे राज्यात मराठी-हिंदी भाषेवरून वाद आणि राजकारण तापलेलं असतानाच, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नवी मुंबईतील वाशीत हिंदी राजभाषा संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. 14 सप्टेंबरला वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सहावे अखिल भारतीय राजभाषा संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, येत्या 14 आणि 15 सप्टेंबर असे दोन दिवस हे संमेलन होणार आहे. देशभरातील हिंदी भाषिक साहित्यिक, संस्था, अधिकारी आणि प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्री तसेच अधिकारीही या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी सिडको प्रदर्शन केंद्राचा परिसर राखीव ठेवण्यात आला असून, 10 हजारांहून अधिक वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याचे नियोजन असल्याची माहिती आहे. गणेशोत्सव आणि गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताचेही नियोजन करण्यात येणार आहे.

एकीकडे राज्यात सुरू असलेल्या मराठी-अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर वाशीत होणाऱ्या हिंदी राजभाषा संमेलनामुळे राजकीय चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेलं असतानाच, केंद्राचा मोठा हिंदी कार्यक्रम मुंबईच्या वेशीवर होणार असल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.