शाळेतील मुलांना ‘खान’ अन् ‘पुष्पा’ हिरो वाटतात; तानाजी मालुसरे, बाजीप्रभूंचं नावही माहिती नाही, समीर वानखेडेंची खंत

शाळेतील मुलांना ‘खान’ अन् ‘पुष्पा’ हिरो वाटतात; तानाजी मालुसरे, बाजीप्रभूंचं नावही माहिती नाही, समीर वानखेडेंची खंत

मुंबई (प्रतिनिधी) : शाळेतील मुलांना ‘खान’ अन् ‘पुष्पा’ हिरो वाटतात, मात्र तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे यांचं नावही अनेकांना माहिती नाही, अशी खंत बहुचर्चित माजी NCB आणि IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमात तरुणांना संबोधित करताना त्यांनी ही खंत बोलून दाखवली.दरम्यान, मनसेकडून आज युवा गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी समीर वानखेडे उपस्थित होते. त्यांच्यासोबत मनसे नेते अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकरही उपस्थित होते.

समीर वानखेडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी आतापासूनच सुरू करण्याचा सल्ला दिला. "इन्स्टाग्रामपेक्षा सामान्य ज्ञानावर भर द्या, रोज अभ्यास करा आणि वर्तमानपत्र वाचा.", असंही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. यासोबतच युवकांनी आपले आदर्श कोणाला मानावं, यावरही वानखेडे यांनी भाष्य केलं.समीर वानखेडे यांनी बोलायला सुरुवात करतानाच ‘वंदे मातरम्.’ म्हटलं. उपस्थित तरुणांनीही त्यांना प्रतिसाद दिला. मात्र, "वंदे मातरम्’चा मला प्रतिसाद येत नाही," असं समीर वानखेडे म्हणाले. त्यानंतर उपस्थित तरुणांनी मोठ्या आवाजात ‘वंदे मातरम्’ म्हणत त्यांना प्रतिसाद दिला.

समीर वानखेडे म्हणाले की, "मला जेव्हा कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी फोन आला, त्यावेळी मी ड्युटीवर होतो. त्यावेळी मला एक कार्यक्रम आहे मुलांचा, तुम्ही या आणि त्यांच्याशी संवाद साधा, असं मला विचारणा झाली. जेव्हा मुलांशी बोलायचं असतं तेव्हा मी ही संधी कधी सोडत नाही.""मला असं वाटतं की, युवक वर्ग आहे, मोठी जनसंख्या आणि महत्त्वाचा वाटा आहे तुमचा. विद्यार्थी होते म्हणून मी आलो. पहिल्यांदा तुमचे अभिनंदन. माझ्यापेक्षा तुम्ही आता एक्सपर्ट आहात, तुमच्याकडे UPSC चे पर्याय आहेत, MPSC असे पर्याय आहेत. जर तुम्हाला तयारी करायची आहे तर आतापासून सुरुवात करा. इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुकपेक्षा जनरल नॉलेजवर भर ठेवा. रोज चांगला अभ्यास करा. रोज पेपर वाचा. तुमच्याकडे बॅकअप प्लॅन पण ठेवा. जर तुम्ही परीक्षा नाही पास झालात तर. जर कोणाला आर्मीमध्ये रुजू व्हायचं आहे." असंही त्यांनी सांगितलं.

"महाराष्ट्राची मुलं जी आहेत, त्यांची UPSC मध्ये टक्केवारी फार कमी आहे. यूपी, बिहार, राजस्थान इकडची टक्केवारी जास्त.. महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे असतील, तर मराठी अधिकारी झाले पाहिजेत. मी मराठी असून मी आंध्र प्रदेश, चेन्नईमध्ये कार्यरत आहे." असं समीर वानखेडे म्हणाले.युवकांच्या आदर्शांबाबत बोलताना समीर वानखेडे यांनी आपल्या अनुभवाचा दाखला दिला. ते म्हणाले, "आपली नवीन पिढी कुठेतरी आपण चुकत आहोत असं मला वाटतं. मी एका छोट्या मुलाला विचारलं की, तुझा हिरो कोण? तर त्यानं एका खानाचं नाव घेतलं. असं दोन-तीन जणांना विचारलं, एक जण बोलला ‘पुष्पा’."

"शिक्षकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, यांची नावं तुम्ही कधी ऐकली आहेत का? मी त्यांना सांगितलं, हिरो म्हणजे छत्रपती महाराज." असं समीर वानखेडे यांनी सांगितलं."कुठेतरी आपण चुकतोय. काहीतरी हरवून जातंय. आपलं आयुष्य घडवायचं आहे, तर असे हिरो पाहिजेत. तुम्ही वाचा त्यांच्याबद्दल. शिवजयंती, 15 ऑगस्ट तेव्हाच फक्त घोषणा द्यायच्या का? रोजच्या दिवशी 10 मिनिटे तुम्ही त्यांच्याबद्दल वाचा. राष्ट्राची सेवा करा." असं आवाहनही समीर वानखेडे यांनी तरुणांना केलं.