NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! मुख्यमंत्र्यांचे गुन्हे मागे घेण्याचे निर्देश; आंदोलनाला नवे वळण
मुंबई (प्रतिनिधी) : NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभाग आणि पोलीस प्रशासनाला दिल्याचा दावा समोर आला आहे. या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील जंतर-मंतरपासून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूरसह विविध शहरांमध्ये NEET पेपरफुटीविरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवल्याच्या आरोपाखाली विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले होते. आता हे गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे नेते जयंत पाटील यांनीही विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवणे योग्य नसल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते.
याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई आणि आंदोलनाच्या हाताळणीबाबतही देशभरात चर्चा सुरू आहे. संबंधित निर्णयामुळे आंदोलनाशी संबंधित पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.




