दिल्लीत आंदोलकांवर लाठीमार; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी उचललं, जे.पी. नड्डांची केवळ १० मिनिटं भेट
मुंबई (प्रतिनिधी) : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून देशाची राजधानी दिल्लीमध्ये आंदोलनाचा प्रचंड भडका उडाला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या ३० दिवसांपासून जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने आता अत्यंत आक्रमक रूप धारण केले आहे.

आज 'कॉक्रोच जनता पार्टी' (CJP) कडून थेट संसदेवर धडक मारण्याचा इशारा देण्यात आला होता. आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी रविवारी रात्रीपासूनच जंतरमंतरवर कडेकोट बॅरिकेडिंग केले होते. मात्र, पोलिसांना गुंगारा देत सीजेपीच्या समर्थकांचा एक मोठा जमाव थेट संसद भवनाच्या परिसरात पोहोचल्याने सुरक्षा यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. या वाढत्या संघर्षानंतर सोमवारी दुपारी पोलिसांनी 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले आहे. पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी सोशल मीडियावरून या अटकेची माहिती दिली.
ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या दाव्यानुसार, संसद भवन परिसरात तब्बल ७५ हजार आंदोलक जमा झाले होते. या जमावाला पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला असून, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. आंदोलक बॅरिकेड्सवरून उड्या मारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी बळाचा वापर केला.
एकीकडे रस्त्यावर लाठीमार सुरू असताना, दुसरीकडे सरकारने आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, या भेटीनंतर आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सौरभ दास (प्रवक्ते, CJP) यांनी 'एक्स'वर (ट्विटर) दिलेल्या माहितीनुसार ,सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना जे.पी. नड्डा यांनी तब्बल २ तास ताटकळत ठेवले.एवढ्या मोठ्या आंदोलनावर चर्चा करण्यासाठी नड्डा यांनी केवळ १० मिनिटे दिली.शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे पत्र लेखी स्वरूपात नड्डा यांच्याकडे सुपूर्द केले असून, त्यांनी पुढील चर्चेचे आश्वासन दिले आहे.
सौरभ दास यांनी ट्विट करत, पोलीस अत्यंत निर्घृणपणे शांततापूर्ण आंदोलन मोडीत काढत असल्याचा आरोप केला आहे. तसेच देशातील सर्व खासदारांनी रस्त्यावर उतरून भविष्य धोक्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दिल्लीतील या राड्यानंतर आता नीट पेपरफुटीचा हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.




