आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नको; गुजरातहून आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर आंदोलन
मुंबई (प्रतिनिधी) : नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांचा आवाज बनलेली आणि देशव्यापी आंदोलन उभे करणारी 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) ची काल (बुधवारी 5 ऑगस्ट) छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजीत दिपकेंच्या घरी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीसह विस्ताराच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. तब्बल 6 तास चाललेल्या या बैठकीनंतर CJP कडून मोठी घोषणा केली जाणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रंका यांनी दिली.

दरम्यान, CJPचे सहकारी असल्याचा दावा करणाऱ्या गुजरातमधून आलेल्या दोन आंदोलकांनी अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर आंदोलन सुरू केले आहे. आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नको, अशी भूमिका मांडत त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल पांड्या आणि मनीष ब्रह्मभट अशी या दोन आंदोलकांची नावे आहेत. हे दोघेही दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनात सुरुवातीपासून सहभागी असल्याचा दावा करत आहेत.
यावेळी बोलताना त्यांनी आरोप केला की, कॉकरोच जनता पार्टीमध्ये लोकशाही नाही. अभिजीत दिपके फक्त आपल्या जवळच्या लोकांना, गर्लफ्रेंडला आणि नातेवाईकांना पक्षात मोठी पदे देत आहेत. आम्ही आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून सहभागी आहोत, मात्र आम्हाला डावलले जात आहे.
आंदोलकांनी पुढे सांगितले की, मी रात्री एक वाजेपर्यंत अभिजीत दिपकेंना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र भेट झाली नाही. जर पक्षात लोकशाही नसेल तर मग या पक्षाचा अर्थ काय? आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे जशी अकाउंटेबिलिटी मागतो, तशीच पक्षातही असली पाहिजे.
तसेच त्यांनी स्पष्ट केले की, आम्ही अभिजीत दिपके यांचे विरोधक नाही. मात्र सध्या पक्षात जे काही सुरू आहे, त्याला आमचा विरोध आहे. पक्षात पारदर्शकता आणि लोकशाही असावी, एवढीच आमची मागणी आहे.




