‘संस्थापकत्व म्हणजे पक्षाची कायमची मालकी नव्हे’; सुप्रिया सुळेंना उमेश पाटलांचा टोला, पोस्ट व्हायरल होताच डिलीट

‘संस्थापकत्व म्हणजे पक्षाची कायमची मालकी नव्हे’; सुप्रिया सुळेंना उमेश पाटलांचा टोला, पोस्ट व्हायरल होताच डिलीट

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाची अधिकृत भूमिका मांडताना त्यांनी शरद पवार यांच्यावर झालेल्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित करत पक्षाचे संविधान आणि सध्याच्या न्यायालयीन लढाईवर थेट भाष्य केले आहे.

"राष्ट्रवादी एकत्रच आहे, आमचा पक्ष एकत्रच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट यांचं नाव शरद पवार आहे. पण चुकीच्या पद्धतीने तो पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आला," असे मोठे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.शरद पवारांवर अन्याय झाला असून त्यासंदर्भातील लढाई सध्या सुप्रीम कोर्टात सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून एक पोस्ट लिहिली. मात्र, काही तासांतच ही पोस्ट डिलीट करण्यात आली. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर ती डिलीट केल्याने आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले, "सुप्रिया ताई म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांनी स्थापन केली, त्यामुळे पक्ष त्यांचाच. शरद पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आहेत, हे ऐतिहासिक सत्य आहे आणि त्यांच्या योगदानाचा आम्हाला आदर आहे. पण ‘संस्थापक’ असणे आणि ‘पक्षाचा तहहयात मालक’ असणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत."

राजकीय पक्ष म्हणजे घर, जमीन, कंपनीतील शेअरहोल्डिंग किंवा वारसाहक्काने मिळणारी खासगी मालमत्ता नाही. पक्षाची घटना, सदस्य, संघटनात्मक रचना आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार राजकीय पक्ष चालतो, असा मुद्दाही उमेश पाटील यांनी मांडला.यासाठी त्यांनी काँग्रेस, भाजप, समाजवादी पार्टी, DMK, AIADMK आणि TDP या पक्षांची उदाहरणे दिली आहेत. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष डब्ल्यू. सी. बॅनर्जी होते. त्यानंतर गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि आज मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाले.

भाजपचे पहिले अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी होते. त्यानंतर अडवाणी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शाह, जे. पी. नड्डा आणि आता नितीन नबीन अध्यक्ष झाले आहेत.समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव असून आज पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आहेत. DMK चे संस्थापक अण्णादुराई, त्यानंतर करुणानिधी आणि आता एम. के. स्टॅलिन नेतृत्व करत आहेत. AIADMK चे संस्थापक MGR होते, त्यानंतर जयललिता आणि आता नेतृत्व एडप्पाडी के. पलानीस्वामींकडे आहे. तर TDP चे संस्थापक NTR असून पुढे पक्षाचे नेतृत्व चंद्राबाबू नायडूंकडे गेले.

मग हे सर्व पक्ष आजही त्यांच्या संस्थापकांची किंवा पहिल्या अध्यक्षांची वैयक्तिक मालमत्ता आहेत, असे कोणी म्हणेल का? संस्थापकत्व हा इतिहास आणि सन्मान आहे; तहहयात मालकीहक्क नाही, असा टोला उमेश पाटील यांनी लगावला.दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, "राष्ट्रवादी एकत्रच आहे, आमचा पक्ष एकत्रच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच पक्ष आहे. पक्षाचे फाउंडर मेंबर कोण आहेत? पक्षाचा फाउंडर प्रेसिडेंट कोण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट यांचं नाव शरद पवार आहे. पण चुकीच्या पद्धतीने तो पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आला."

पक्षाचे संविधान पाहिल्यास शरद पवारांवर अन्याय झाल्याचे दिसते आणि त्याची लढाई सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. "अधिकाराने आणि न्यायाने तो पक्ष शरद पवार यांना परत करावा. हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नाही, तर तो संविधानाने चालतो," अशी भूमिका त्यांनी मांडली.पक्ष परत मिळाल्यानंतर पवार साहेबांनी त्या पक्षाचे काय करायचे, तो निर्णय त्यांनी घ्यावा. त्यानंतर पक्ष कोणाला द्यायचा किंवा नेतृत्व कोणी करायचे, हा पूर्णपणे शरद पवारांचा निर्णय असेल, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले होते.आता उमेश पाटील यांची पोस्ट डिलीट केल्याने आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.