कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका? राधानगरी ९७ % भरले; ३० बंधारे पाण्याखाली!
कोल्हापूर /प्रतिनिधी : महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे. विशेषतः धरण क्षेत्रांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती आहे? पंचगंगा नदीची पातळी कुठे पोहोचली आहे? आणि हवामान विभागाने पुढील ३ दिवसांसाठी काय इशारा दिला आहे? जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टमध्ये."

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केल्याने पंचगंगा नदीचे पाणी यंदाच्या हंगामात तिसर्यांदा पात्राबाहेर पडली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान धारण क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. त्याच बरोबर नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होताना दिसत आहे. सध्या पंचगंगा नदी तिसऱ्यांना पात्राबाहेर पडली असून पंचगंगेची पाणीपातळी सध्या ३१ फूट ५ इंचांवर पोहोचली असून राजाराम बंधाऱ्यासह जिल्ह्यातील तब्बल ३० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वाहतुकीवर हि परिणाम झाला आहे. अनेक बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये २ जिल्हा मार्ग बंद असून ९ ग्रामीण मार्ग बंद आहेत. धारण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. धरणानांच्या पाणी साठ्यातही जपट्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या राधानगरी धरणात ९७ टक्के तर काळम्मावाडी धरणात ५९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्याचबरोबर तुळशी धरणात ७८ टक्के तर वारणा धरणात ८५ टक्के पाणीसाठा आहे. शहरात पावसाची उघडझाप असली तरी धरण क्षेत्रात पाऊस कायम आहे.
तसेच हवामान विभागाकडूनही तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामूळ प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या धरण क्षेत्रासह मुक्त पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पाऊसामुळे नदीचा प्रवाह वेगाने वाढत आहे. गतवर्षांच्या अनुभवावरून जुलैअखेर आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पर्जन्यमान जास्त असते. त्यातच यंदा अलनिनोचा प्रभाव सक्रिय असल्याने काही भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे. ही संभाव्य पूरस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक शासनाला आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.
दुसरीकडे, पुण्यात पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या साठ्यातही वाढ झाली असून, सांगली विभागाने कृष्णा खोऱ्यात संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटक प्रशासनाला अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याची विनंती केली आहे.




