ठाकरे गटातील दोन खासदारांना भाजपमध्ये यायचं होतं? मुख्यमंत्री फडणवीसांनी केला मोठा खुलासा
मुंबई (प्रतिनिधी) : ठाकरे गटातून नुकतेच सहा खासदार शिवसेनेत दाखल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या पक्षांतरामागील पडद्यामागची माहिती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघड केली आहे.एका मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, हे संपूर्ण ऑपरेशन शिवसेनेने केलं असून भाजपने मित्रपक्ष म्हणून आवश्यक ते सहकार्य केलं.

यावेळी त्यांनी एक मोठा दावा करत सांगितलं की, पक्षांतर करणाऱ्या खासदारांपैकी एक-दोन जणांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपने त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, "आमच्याकडे सध्या व्यवस्था नाही. तुम्ही शिवसेनेतच जा, कारण तुम्ही त्या पक्षातूनच निवडून आला आहात."
निधी मिळत नसल्यामुळे खासदारांनी पक्ष सोडल्याचा दावा देखील फडणवीसांनी फेटाळून लावला. त्यांच्या मते, राजकारणात प्रत्येक नेता आपल्या भविष्यासाठी निर्णय घेत असतो. जेव्हा नेतृत्व कार्यकर्त्यांना आणि लोकप्रतिनिधींना आत्मविश्वास देऊ शकत नाही, तेव्हा ते दुसरा पर्याय निवडतात.यासोबतच महायुती सरकारमध्ये कोणताही मोठा वाद नसल्याचं सांगत फडणवीसांनी सरकार सुरळीत सुरू असल्याचा दावा केला. स्थानिक पातळीवर काही मतभेद असले तरी ते तात्पुरते असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
प्रशासकीय पारदर्शकतेबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, ओव्हर-एस्टिमेशन झालेल्या सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या टेंडर्स रद्द करण्यात आल्या. तसेच विविध विकासकामांच्या नव्या अंदाजपत्रकांमुळे हजारो कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावाही त्यांनी केला.मुख्यमंत्री फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.




