डीजेमुळे सख्खा चुलत भाऊ गमावला; मंत्री मेघना बोर्डीकरांचा डीजेला विरोध ?

डीजेमुळे सख्खा चुलत भाऊ गमावला; मंत्री मेघना बोर्डीकरांचा डीजेला विरोध ?

 धाराशिव: पुण्यात गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजेच्या विरोधात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, आता मंत्री मेघना बोर्डीकर यांनीही डीजेला थेट विरोध दर्शवला आहे. आमदार बसवराज पाटील यांच्या कार्यक्रमासाठी धाराशिव येथे आल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी गेल्या वर्षी गणपतीत डीजेच्या अति आवाजामुळे आपल्या सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू झाल्याची अत्यंत वेदनादायी आठवण सांगितली. सर्वोच्च न्यायालयाने डीजे बंदीचे आदेश दिले असतानाही आपण त्याचे पालन करत नाही, ही बाब चुकीची असून सण-उत्सव साजरे करताना प्रत्येकाने काही मर्यादा पाळल्या पाहिजेत, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.


 पुण्यात गणेशोत्सवात डीजेला विरोध करणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्या भूमिका आणि त्यांच्यावरील हल्ल्यानंतर राज ठाकरे यांच्यानंतर आता सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनीही डीजेच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. बापट यांच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे दुजोरा देत बोर्डीकरांनी ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले.

 दुष्काळ आणि जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य

यावेळी बोलताना मंत्री मेघना बोर्डीकर यांनी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण परिस्थितीवर जातीने लक्ष ठेवून असून योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर मार्ग काढण्यासाठी मंत्रिमंडळाची समिती चर्चा करत असून लवकरच योग्य तोडगा निघेल, असेही त्या म्हणाल्या.