छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले; पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले; पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून पेण शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. पेणच्या संभाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या या पुतळ्यावरून पेण नगरपालिकेला मोठ्या रोषाचा सामना करावा लागत आहे.छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाचा जबडा फाडला होता, अशी एक दंतकथा प्रचलित आहे. हाच प्रसंग दाखवणारा हा पुतळा आहे. लो-पॉली या आधुनिक कलाशैलीत हा पुतळा तयार करण्यात आला आहे. या पद्धतीने तयार करण्यात येणारे पुतळे हे एक प्रकारची भूमितीय रचना असतात.

मात्र, हा पुतळा पाहिल्यानंतर तो नेमका छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, हे सहजपणे लक्षात येत नाही. किंबहुना लो-पॉली ही आधुनिक कलाशैली परिचित नसणाऱ्यांना हा पुतळा संभाजी महाराजांचा आहे, हे सांगूनही त्यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे पेण नगरपालिकेच्या या निर्णयावर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. भावी पिढीला आपण हेच छत्रपती संभाजी महाराज दाखवणार आहोत का, असा सवालही शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

या संपूर्ण प्रकारानंतर पेण नगरपालिकेविरोधात टीकेची झोड उठली आहे. पुतळ्याची ही रचना छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला साजेशी नसल्याची भावना अनेक स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. तर शिवप्रेमींनीही याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पेण नगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच शहरातील चौकात या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. याबाबत सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. हा पुतळा संभाजी महाराजांचा वाटत नाही. सार्वजनिक ठिकाणी असा पुतळा उभारणे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, त्यांची राष्ट्रभक्ती आणि प्रत्येक शिवप्रेमीच्या श्रद्धेचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

त्यामुळे हा पुतळा तातडीने चौकातून हटवण्यात यावा आणि त्याठिकाणी धर्मवीर संभाजी महाराजांच्या कीर्तीला साजेसा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी रघुजीराजे आंग्रे यांनी केली आहे.

लो-पॉली ही एक आधुनिक कलाशैली आहे. या प्रकारात प्रामुख्याने स्टेनलेस स्टीलचा वापर करून एखादी रचना तयार केली जाते. अलीकडच्या काळात या पद्धतीचे पुतळे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांसारख्या व्यक्तिमत्त्वाचा, ज्यांना मराठ्यांच्या इतिहासात अत्यंत मानाचं स्थान आहे, त्यांचा पुतळा अशा पद्धतीने उभारणं अनेकांच्या पचनी पडलेलं नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा इतर ऐतिहासिक महापुरुषांचे पुतळे म्हटलं की घोड्यावर स्वार, हातात उंचावलेली तलवार अशा स्वरूपातील पुतळे पाहण्याची आपल्याला सवय आहे. या पुतळ्यांमधून संबंधित महापुरुषांचा पराक्रम आणि महनीयता ठळकपणे जाणवते. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळते आणि अभिमानाची भावना निर्माण होते.

याउलट लो-पॉली शैलीतील पुतळ्यांवरून संबंधित व्यक्तीची ओळख लगेच पटत नाही. ही एक भूमितीय रचना असल्यामुळे ऐतिहासिक महापुरुषांच्या चेहऱ्यावर दिसणारे शौर्य, हावभाव आणि व्यक्तिमत्त्वाची झलक या प्रकारच्या पुतळ्यांमध्ये जाणवत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.