पाणीटंचाईला पूर्णविराम! वातावरणातील आर्द्रतेतून तयार होतेय शुद्ध पिण्याचे पाणी
मुंबई (प्रतिनिधी) :विदर्भातील पाणीटंचाई ही दीर्घकाळापासून गंभीर समस्या मानली जाते. स्वातंत्र्यानंतर अनेक उपाययोजना झाल्या, पण त्या अनेकदा अपुऱ्या पडताना दिसतात. अशा परिस्थितीत वाशिम जिल्ह्यातील एका गावाने वेगळाच आणि आधुनिक प्रयोग राबवत लक्ष वेधून घेतले आहे.वाशिम जिल्ह्यात मधील रिसोड तालुक्यातील वाडी विलेज येथे वातावरणातील आर्द्रतेतून पिण्याचे पाणी निर्माण करणारे अत्याधुनिक ओटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन यंत्र बसविण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे वडजी गाव हे राज्यातील अशा प्रकारचे तंत्रज्ञान वापरणारे एकमेव गाव असल्याचे सांगितले जाते. तत्कालीन सरपंच शत्रुघ्न मधुकर बाजड यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प राबविण्यात आला.हैदराबाद येथील एका कंपनीचे हे यंत्र गावातील नागरिकांना, विशेषतः शाळकरी विद्यार्थी आणि अंगणवाडीतील मुलांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देत आहे. हे यंत्र हवेतून आर्द्रता शोषून ती संक्षेपित करते, त्यानंतर फिल्टर आणि खनिजे मिसळण्याच्या प्रक्रियेतून पाणी पिण्यायोग्य बनवले जाते.
गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीत हे यंत्र बसविण्यात आले असून, ग्रामीण भागात स्वच्छ पाण्यासाठी हा एक नाविन्यपूर्ण आणि दिशादर्शक प्रयोग मानला जात आहे. मात्र या तंत्रज्ञानाचे दीर्घकालीन फायदे आणि मर्यादा याबाबत पुढील काळात अधिक स्पष्टता येईल.




