आमच्या तीन पिढ्यांचे घनिष्ठ संबंध, वैयक्तिक मोठे नुकसान ; डॉ. डी. वाय. पाटलांच्या निधनावर मालोजीराजेंची प्रतिक्रिया

"शिक्षण क्षेत्रातील महान क्रांतिकारक हरपला"
माध्यमांशी बोलताना मालोजीराजे छत्रपती म्हणाले की, "दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. समाजातल्या गोरगरीब मुला-मुलींना रोजगाराभिमुख शिक्षण मिळाले पाहिजे, या उद्देशाने त्यांनी लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. समाजातील उपेक्षित घटक, सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक संस्थांना दादांचा नेहमीच मोठा आधार असायचा."
"छत्रपती घराण्याशी तीन पिढ्यांचे ऋणानुबंध"
आपल्या भावना व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की, "छत्रपती घराण्यासाठी हे वैयक्तिक मोठे नुकसान आहे. माझे आजोबा, विद्यमान खासदार छत्रपती शाहू महाराज आणि आताची आमची पिढी अशा सलग तीन पिढ्यांचे दादांच्या घराण्याशी अतिशय घनिष्ठ संबंध राहिले आहेत. त्यांच्या जाण्याने आमचेही फार मोठे कौटुंबिक व वैयक्तिक नुकसान झाले आहे."
मालोजीराजे छत्रपती यांनी छत्रपती घराण्याच्या वतीने आणि स्वतःच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील साहेबांना ईश्वरचरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




