मुंबई-पुणे मिसिंग लिंकमध्ये मोठा घोटाळा? नवयुगा-ॲफकॉन्सवर कारवाईची रोहित पवारांची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) : रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, अवघ्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या बोगद्यात तडे पडल्याचे, तसेच आत पाण्याची गळती होत असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत या प्रकल्पाच्या दर्जाबाबत मोठे प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रकल्पाचे काम करणाऱ्या नवयुगा इंजिनिअरिंग आणि ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांवर तातडीने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, हा प्रकल्प "मिसिंग लिंक" नसून "भ्रष्टाचाराला लिंकिंग करणारा मार्ग" असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, लोणावळ्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर मिसिंग लिंक मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक जवळपास साडेअठरा तास बंद होती. सुमारे १०० टन माती आणि दगड रस्त्यावर आल्याने मोठे अडथळे निर्माण झाले. प्रशासनाने मार्ग खुला केला असला तरी सध्या केवळ दोन लेनवरून वाहतूक सुरू असून, बोगद्याच्या परिसरातून अजूनही पाणी आणि छोटे दगड खाली येत असल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत आणि बांधकामाच्या गुणवत्तेबाबत चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. आता सरकार या आरोपांवर काय भूमिका घेणार आणि संबंधित कंपन्यांबाबत कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




