तो कोण कुरळ्या केसांचा बाबा?; राज ठाकरेंनी रावणाच्या पुत्रांचा किस्सा सांगत अनिरुद्धाचार्यांची उडवली खिल्ली

तो कोण कुरळ्या केसांचा बाबा?; राज ठाकरेंनी रावणाच्या पुत्रांचा किस्सा सांगत अनिरुद्धाचार्यांची उडवली खिल्ली

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील एका मेळाव्याला संबोधित करताना देशातील सद्यस्थितीवर बोट ठेवले. यावेळी त्यांनी परदेशात जाण्याबाबतच्या सरकारी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच, सोशल मीडियावर धार्मिक पौराणिक कथा सांगणाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. विशेषतः, 'कुरळ्या केसांचा बाबा' असे म्हणत त्यांनी कथाकार अनिरुद्धाचार्य यांच्या प्रवचनांवर आणि त्यांच्या दाव्यांची जोरदार खिल्ली उडवली.

 

काय म्हणाले राज ठाकरे?
सध्या देशात इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून एक विशिष्ट वातावरण तयार केले जात आहे, असे सांगत राज ठाकरेंनी प्रवचनकारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. "तो एक कुरळ्या केसांचा बाबा आहे ना, केस वाढवलेला... तो काहीही कथा सांगतो आणि लोक भाबडेपणाने ऐकतात," असे म्हणत त्यांनी एका अलीकडील प्रवचन कथेचा समाचार घेतला. राम-रावणाच्या युद्धाबाबत अनिरुद्धाचार्यांनी सांगितलेल्या दाव्याचा विपर्यास करताना राज ठाकरे म्हणाले, "त्या युद्धात रावणाचे एक लाख पुत्र आणि दीड लाख नातू मारले गेले, असे सांगितले जाते. मला जितके माहीत आहे त्यानुसार रावणाला फक्त दहा तोंडं होती. एक लाख मुलं? मग रावण जेवला वगैरे की नाही? अशा काहीही भाकडकथा लोकांना सांगितल्या जातात."

अस्त्रालय आणि देशांच्या नावावरून टोमणे
 पुढे बोलताना राज ठाकरेंनी 'अस्त्रालय' वरून 'ऑस्ट्रेलिया' झाल्याचा दावा करणाऱ्या वक्तव्याचाही समाचार घेतला. "युद्धानंतर रामाने हनुमानाला अस्त्रे दहा हजार किलोमीटर लांब ठेवून येण्यास सांगितले आणि ती जिथे ठेवली, त्या 'अस्त्रालयाचे' पुढे 'ऑस्ट्रेलिया' झाले, असे हा बाबा सांगतो. हे असे असेल तर मग न्यूझीलंड, हॉलंड आणि इंग्लंडच्या नावांचे काय करायचे?" असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. समोर बसलेले लोकही हे सगळे शांतपणे ऐकत असतात, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा डाव
लोकांना जाणीवपूर्वक जातीच्या आणि धर्माच्या वादात गुंतवून ठेवले जात आहे, जेणेकरून ते देशातील बेरोजगारीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारू शकणार नाहीत, असा आरोप राज ठाकरेंनी केला. देशात बेरोजगारीची परिस्थिती अत्यंत भयानक असून, आंधळेपणाने पक्षाचे समर्थन करणारे लोक केवळ स्वतःची समजूत काढत असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.