‘उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, शिंदेंना टार्गेट करण्यासाठी जरांगेंना सुपारी’; नवनाथ वाघमारेंचा आरोप
मुंबई (प्रतिनिधी) : उद्या राज्यात मराठा आणि ओबीसी समाजातील तणाव वाढून दंगल झाली, तर त्यासाठी उदय सामंत आणि प्रसाद लाड हे दोन नेते जबाबदार असतील. हे दोन्ही नेते मनोज जरांगे यांना आर्थिक रसद पुरवून हा विषय तापता ठेवत आहेत, असा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला. उदय सामंत यांना आता उपमुख्यमंत्री होण्याची स्वप्नं पडत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यासाठी ते मनोज जरांगे यांना पुढे करत असल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे, उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे यांनी गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मराठा समाजाला जवळ केलं. मात्र, आता मनोज जरांगे त्यांच्यावरच उलटले आहेत, असा दावा त्यांनी केला.
उदय सामंत यांना सतत उपमुख्यमंत्री होण्याची स्वप्नं पडत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यासाठी ते मनोज जरांगे यांना पुढे करत आहेत. लवकरच उदय सामंत भाजपवासी झालेले दिसतील, असा दावाही नवनाथ वाघमारे यांनी केला.
मध्यंतरी उदय सामंत हे भाजपच्या संपर्कात होते आणि शिवसेनेतील एक गट फोडण्याच्या तयारीत होते, असा आरोप त्यांनी केला. उदय सामंत शिंदे गटात अस्थिर असून, उद्योग खात्याच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना कोट्यवधी रुपये देऊन एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलायला सांगत असल्याचा गंभीर आरोप वाघमारे यांनी केला. एकनाथ शिंदे यांचं राजकीय अस्तित्व कमी झाल्यानंतर शिवसेना आमदारांचा एक गट फोडण्याची उदय सामंत यांची योजना असल्याचंही त्यांनी म्हटलं.
तसेच प्रसाद लाड यांनाही मंत्रिपदाची स्वप्नं पडू लागली आहेत, असा आरोप वाघमारे यांनी केला. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर प्रसाद लाड लगेच उत्तर देण्यासाठी पुढे येतात. मात्र, तेच मनोज जरांगे यांना रसद पुरवून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
प्रसाद लाड यांना सरकारकडून अनेक टेंडर देण्यात आले असून, त्यातून त्यांनी अमाप संपत्ती गोळा केल्याचा आरोपही नवनाथ वाघमारे यांनी केला. "सरकारनेच दूध पाजलंय या सापाला, तोच आता त्यांना डसतोय," अशी जहरी टीकाही त्यांनी केली.
उद्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी दंगल झाली, तर उदय सामंत आणि प्रसाद लाड हे दोन नेते त्यासाठी जबाबदार असतील. तेच मनोज जरांगे यांना रसद पुरवत आहेत, असा आरोप त्यांनी पुन्हा केला. मनोज जरांगे यांच्याकडे लक्ष देऊ नका, मात्र हे दोन्ही नेते कुठे जात आहेत यावर सरकारने लक्ष ठेवावं, असं त्यांनी म्हटलं.
या दोघांनी रसद पुरवली नाही तर मनोज जरांगे काहीच करू शकत नाहीत. ओबीसी समाजाचं आरक्षण संपवण्यासाठी उदय सामंत आणि प्रसाद लाड यांना पुढे केलं जात आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या दोघांपासून सावध राहिलं पाहिजे, असं नवनाथ वाघमारे यांनी म्हटलं.




