मिसिंग लिंकवरून सभागृहात फडणवीसांचा संताप; 'महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही'

मिसिंग लिंकवरून सभागृहात फडणवीसांचा संताप; 'महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही'

मुंबई (प्रतिनिधी) : मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर सरकारवर करण्यात आलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. "माझ्यावर टीका करा, पण महाराष्ट्राची बदनामी करू नका. राज्याचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.

फडणवीस म्हणाले की, दरड कोसळल्यानंतर अवघ्या 18 तासांत मिसिंग लिंकवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. या घटनेतून अनेक तांत्रिक धडे मिळाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आयआयटीच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने नव्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

मिसिंग लिंक हा केवळ रस्ता नसून एक अभियांत्रिकी चमत्कार असल्याचा दावा करत त्यांनी हा भारतातील सर्वात उंच केबल-स्टेड पूल आणि जगातील सर्वात रुंद बोगदा असल्याचे सांगितले. दरड कमानीवर कोसळली, त्यामुळे बोगद्याला कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने प्रतिसाद दिल्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित झाली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सोशल मीडियावर अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवरही त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. राज्याच्या विकासकामांबाबत चुकीची माहिती पसरवून महाराष्ट्राची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल, असेही फडणवीस म्हणाले.