खरातची सासू पार्वती म्हणाल्या, तो तिकडे जाऊन..
मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी आज पुन्हा नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे. त्यामुळे पोलीस पुन्हा आज अशोक खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. त्याआधी अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची आई पार्वती शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना महत्वाची माहिती दिली.

मी एक महिन्यापासून इथे आली आहे. काय चौकशी होते आम्हाला काही माहिती नाही. कल्पना कुठे आहे मला माहिती नाही. तिच्याशी फोनवर बोलणे झाले नाही. हे कधी थांबेल सांगता येत नाही, असं पार्वती शिंदेंनी सांगितले. तसेच अशोक खरात काय करायचा माहीत नाही. अधिकारी कुटुंबीयांसोबत चौकशी करत आहेत, मला माहिती नाही. माझी चौकशी झाली नाही. मला काहीच माहिती नाही. मी शिक्षित नाही, मला नीट बोलताही येत नाही, असंही पार्वती शिंदे यावेळी म्हणाल्या. तसेच अशोक खरातने केलेल्या कारनाम्यावर विचारले असता, तो जात होता, त्याच्या ऑफिसमध्ये तिकडे जाऊन काय करायचा माहिती नाही. मला आणि कल्पनाला काहीच माहिती नव्हते, असं पार्वती शिंदेंनी सांगितले. तसेच अशोक खरातला शिक्षा व्हायला हवी की नाही, असा प्रश्न विचारल्यास शिक्षा नाही व्हायला हवी, पण त्याला आता कोण सोडवणार.असंही पार्वती शिंदेंनी सांगितले.
शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा कल्पना खरातवर दाखल झाल्यापासून खरातची पत्नी कल्पना नाशिकच्या घरून फरार झाली आहे. 15 दिवस होऊनही तपास यंत्रणेला तिला शोधण्यात अपयश आले आहे. आता पोलिसांनी तपासाची चक्र फिरवले असून कल्पनाच्या माहेरी तसेच माहेरच्या तिच्या नातेवाइकांकडे चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कल्पना खरातच्या नाशिकमधील काही मैत्रिणी, तसेच तिच्या घरी सध्या काम करणाऱ्या अन् यापूर्वी काम केलेल्या काही नोकरांकडेही कल्पनाची चौकशी करण्यात आली. पथकाला काही ठोस पुरावे मिळत नसल्याने फरार कल्पनाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.




