कुणाल दराडेंकडून शिवीगाळ, बाप काढला’; गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम, नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

कुणाल दराडेंकडून शिवीगाळ, बाप काढला’; गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम, नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. मात्र, नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीला मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी नाशिकमध्ये प्रचंड 'हायव्होल्टेज ड्रामा' पाहायला मिळाला. कुणाल दराडे यांनी फोनवरून शिवीगाळ करत धमकी दिल्यामुळे गोकुळ गीते यांनी अर्ज मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. धमकी दिल्याने माघार न घेण्याच्या भूमिकेवर गोकुळ गीते ठाम राहिले असून, महायुतीतील बंडखोरीचे वादळ शमवण्यात अडचणी येत आहेत.

दुसरीकडे, गोकुळ गीते यांचे बंधू आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते हे स्वतःचा अर्ज मागे घेण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना गणेश गीते म्हणाले, "आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. आम्ही जो शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांना दिला होता, तो शब्द आम्ही पाळणार आहोत." तसेच, गोकुळ गीते हे देखील लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात येतील आणि माघार घेतील, असा विश्वास गणेश गीते यांनी व्यक्त केला. यादरम्यान गणेश गीते यांच्या सहकाऱ्यांनी मीडियासमोरच फोनवर गोकुळ गीते यांच्याशी बातचीत करत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल दराडे यांनी फोनवरून संपर्क साधून गोकुळ गीते यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. आमचा बाप काढल्यामुळे मी नाराज आहे. अशा प्रकारे धमकी दिल्याने मी आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशी बतावणी करत गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत.