एअर इंडिया इमारतीतून चालणार सरकारचा कारभार! 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईच्या नरिमन पॉईंटमधील ऐतिहासिक एअर इंडिया इमारतीतून लवकरच राज्य सरकारचा कारभार सुरू होणार आहे. राज्य सरकारने केंद्राकडून ही इमारत विकत घेतल्यानंतर येथे नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू असून, येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाची बैठकही याच ठिकाणी होण्याची शक्यता आहे.

मरीन ड्राईव्हच्या सी-फेसिंग परिसरात असलेल्या या 23 मजली इमारतीच्या टॉप फ्लोअरवर म्हणजेच 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे भव्य कार्यालय उभारले जात आहे. तर 22 व्या मजल्यावर अत्याधुनिक कॅबिनेट हॉल तयार केला जात असून, आज मुख्य सचिवांच्या उपस्थितीत या कामाचा आढावा घेतला जाणार आहे.
1972 मध्ये उभारण्यात आलेली ही इमारत राज्य सरकारने केंद्राकडून 1,601 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी 181 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
23 व्या मजल्यावर 5,611 चौरस फूट जागेत मुख्यमंत्र्यांचे सी-फेसिंग कार्यालय, तर 22 व्या मजल्यावर 13,363 चौरस फूट जागेत आधुनिक कॅबिनेट हॉल तयार होणार आहे. याशिवाय दोन मजली पार्किंगमध्ये 152 वाहनांची व्यवस्था आणि दोन्ही बाजूंनी प्रवेशद्वार असल्याने वाहतुकीची सुविधाही अधिक सक्षम होणार आहे.
मंत्रालयातील जागेची कमतरता लक्षात घेऊन आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता यांसारखे महत्त्वाचे विभाग या इमारतीत स्थलांतरित केले जाणार आहेत. त्यामुळे अनेक विभागांचे कामकाज एकाच छताखाली येईल आणि शासनाचा दरमहा होणारा कोट्यवधी रुपयांचा भाडे खर्चही कमी होण्यास मदत होईल.
सध्या इमारतीचे नूतनीकरण सुरू असून, पुढील तीन ते चार महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण इमारतीपूर्वी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय आणि कॅबिनेट हॉल असलेले वरचे दोन मजले प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लवकरच मंत्रालयासोबतच एअर इंडिया इमारतीतूनही राज्याचा कारभार सुरू झालेला पाहायला मिळणार आहे.




