शाहरुख खानच्या एका पत्रानं बदललं श्रेयस तळपदेचं नशीब, फराह खाननं सांगितला खास किस्सा
मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता श्रेयस तळपदेने नुकताच आपल्या आयुष्यातील एक भावूक आणि प्रेरणादायी किस्सा शेअर केला आहे. मुंबईत स्वतःचं पहिलं घर घेण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण होण्यामागे बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि दिग्दर्शिका फराह खान यांचा मोठा वाटा असल्याचं त्याने सांगितलं.

फराह खानच्या कुकिंग व्लॉगमध्ये श्रेयस तळपदेच्या घराची झलक पाहायला मिळाली. गप्पांच्या ओघात श्रेयसने सांगितलं की, 'ओम शांती ओम' हा चित्रपट त्याच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला. याच चित्रपटामुळे त्याला मुंबईत स्वतःचं पहिलं घर घेता आलं.
श्रेयसने सांगितलं की, जेव्हा तो होम लोनसाठी बँकेत गेला, तेव्हा त्याचं कर्ज लगेच मंजूर झालं नव्हतं. बँकेतील अधिकाऱ्यांनी तो आणखी कोणत्या चित्रपटात काम करत आहे, अशी विचारणा केली. त्यावर त्याने 'ओम शांती ओम' चं नाव सांगितलं. पुढे चित्रपटात शाहरुख खान आणि दिग्दर्शक म्हणून फराह खान यांची नावं ऐकल्यानंतर बँकेने त्यांच्याकडून एक अधिकृत पत्र आणण्याची विनंती केली.
यानंतर श्रेयसने फराह खानशी संपर्क साधला. अवघ्या दोन दिवसांत फराहने शाहरुख खानकडून आवश्यक पत्र मिळवून दिलं. विशेष म्हणजे, ते पत्र बँकेत सादर केल्यानंतर त्याच संध्याकाळी होम लोनला मंजुरी मिळाली.हा किस्सा ऐकल्यानंतर फराह खाननेही हसत प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "हे ऐकून मला खूप आनंद झाला. म्हणजे 'ओम शांती ओम'मुळे तुझं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं."
२००७ मध्ये प्रदर्शित झालेला 'ओम शांती ओम' हा चित्रपट शाहरुख खानच्या दुहेरी भूमिकेमुळे, दीपिका पदुकोणच्या दमदार पदार्पणामुळे आणि सुपरहिट संगीतामुळे प्रचंड गाजला होता. आजही हा चित्रपट बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो.श्रेयस तळपदेचा हा अनुभव केवळ एका घराचा नाही, तर योग्य वेळी मिळालेल्या विश्वास आणि सहकार्यामुळे आयुष्याची दिशा कशी बदलू शकते, याचंही सुंदर उदाहरण ठरतो.




