‘देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत जातील’; फडणवीसांच्या दिल्लीवारीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

‘देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत जातील’; फडणवीसांच्या दिल्लीवारीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी, 17 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली दिल्लीला रवानगी होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.‘तारे तोडायचे, फुगे उडवायचे, पतंग उडवायची, त्याला ती उडवू द्या. कुणी काहीही म्हणत राहिले तरी मी मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं.

मात्र, त्यानंतर आज मंगळवारी, 18 ऑगस्ट रोजी शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ‘देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत जातील,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, जंतर-मंतरच्या प्रकारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक उत्तम कॅबिनेट बनवायचं आहे आणि त्यासाठी त्यांना देवेंद्र फडणवीसांची आवश्यकता आहे, असं ते सांगतात. कालच्या भेटीतही पंतप्रधानांनी देवेंद्रजींना हे सांगितलेलं असणार.

‘मग ते रिकामटेकडे आहेत का? देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत जातील. आवरावं लागतं ना घर, जेव्हा आपण ते बदलतो,’ असं संजय राऊत म्हणाले.महाराष्ट्रातून अनेक नेते दिल्लीला गेले असल्याचं सांगत राऊत यांनी यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण आणि गोपीनाथराव मुंडे यांचा दाखला दिला. ‘मूळ घर आवरावं लागतं, त्याला थोडा वेळ लागतो. स्थिर-स्थावर करावं लागतं, आपापल्या माणसांची सोय करावी लागते, कुटुंबाची व्यवस्था करावी लागते,’ असंही राऊत यांनी म्हटलं.

‘देवेंद्रजींना राष्ट्र साद घालत आहे. ते म्हणतात मी इथेच राहणार, तुमची खूप इच्छा आहे, पण तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला ढकलतात, त्याचं काय?’ असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.तसंच, ‘तुमच्या आजूबाजूचे लोक तुम्ही दिल्लीत जावं म्हणून देव पाण्यात घालून बसलेले आहेत,’ असा दावाही राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील नेत्याने राष्ट्राचं नेतृत्व करावं, ही आमची सद्भावना असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, काही लोक देवेंद्र फडणवीस यांच्या जागी बसण्यासाठी उत्सुक असल्याचा दावा करत, ‘ते कधी एकदा दिल्लीत जात आहेत आणि कधी एकदा आम्ही त्यांच्या जागी बसतो, असे बरेच लोक आहेत,’ असंही राऊत म्हणाले.दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध विकासकामे आणि महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी या भेटी झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

आपल्या दिल्लीतील नियुक्तीच्या चर्चेबाबत विचारण्यात आलं असता फडणवीस म्हणाले की, ‘अनेक रिकामटेकडे लोक आहेत. त्यांना माझ्याबद्दल वेगवेगळी चर्चा करायला आवडते. त्यांना त्याचा आनंद घेऊ द्या.’‘महाराष्ट्राच्या जनतेसह माझे नेते नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे. मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि करत राहीन. अनेक लोकांना वाटतं की, मी दिल्लीत गेलं पाहिजे. पण त्या सगळ्यांना सांगतो की, मी मुंबई आणि महाराष्ट्रातच आहे,’ असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.