“तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 पाडू”; लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंना प्रतिआव्हान
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारला इशारा देत 2029 मध्ये तुमचे 25 आमदार पाडू, सरकारही पाडू, असं म्हटलं होतं. यावर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना जाहीरपणे प्रतिआव्हान दिलं आहे.गेवराईतील कार्यक्रमात लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगेंना राजकारणाचं गणित कळत नाही. तुम्ही आमचे 25 आमदार पाडणार असाल, तर आम्ही तुमचे 100 आमदार पाडू. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा राजकीय आखाडा आणखी तापल्याचं दिसून येत आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेला हा संघर्ष आता थेट निवडणुकीच्या राजकारणापर्यंत पोहोचला आहे. 2029 मध्ये खरंच कोणाची ताकद भारी पडणार, जरांगे की हाके, याचा फैसला आता महाराष्ट्राची जनता करणार आहे.मनोज जरांगे वारंवार 58 लाख कुणबी नोंदीचा उल्लेख करून मराठा आणि ओबीसी समाजात संभ्रम निर्माण करत आहेत, असा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला आहे.
न्यायमूर्ती शिंदे समितीने आजवर राज्यात शोधलेल्या कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी नोंदींची संख्या 58 लाख 90 हजार 155 इतकी आहे. मात्र, यातील 37 लाख 47 हजार 142 नोंदी या 1986 ते 2023 दरम्यानच्या जुन्या नोंदी आहेत. या नोंदींच्या आधारे आधीच ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या नोंदींचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी थेट संबंध नसल्याचा दावाही महासंघाने केला आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर न्यायमूर्ती शिंदे समितीला मराठवाड्यात 49 हजार 358 नोंदी आढळल्या. त्यापैकी केवळ 20 हजार 143 लोकांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. तर 15 हजार 597 लोकांना कुणबी म्हणून ओबीसी प्रमाणपत्र मिळालं. हेच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं यश असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितलं.
शासनाच्या आकडेवारीनुसार, न्यायमूर्ती शिंदे समितीनंतर 3 लाख 11 हजार 287 लोकांना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा असल्याचं जात प्रमाणपत्र देण्यात आलं. मात्र, त्यापैकी 2 लाख 91 हजार 144 जणांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज का केला नाही, असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाने उपस्थित केला आहे.
ज्यांच्याकडे कुणबी नोंदीचे कागदपत्र आहेत, त्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे, ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका आहे. ज्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालं आहे, त्यांचं महासंघ स्वागत करत असल्याचंही बबनराव तायवाडे यांनी सांगितलं. मात्र, खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र घेतलं जात असेल, तर ते सहन करणार नसल्याचं तायवाडे यांनी स्पष्ट केलं.दरम्यान, सोलापुरात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात मराठा समाज आंदोलनाच्या तयारीत आहे. मराठा समाजातील महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांच्यावर आहे.
वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काल मराठा समाजाने ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्याने मराठा समाजाकडून आज आंदोलन करण्यात येणार आहे. सोलापुरातील चार हुतात्मा स्मारकासमोर आज दुपारी हे आंदोलन होणार आहे. दरम्यान, जालना येथे नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसंच, नवनाथ वाघमारे दिसेल तिथे हाणा आणि दहा लाख रुपये बक्षीस मिळवा, अशी आक्षेपार्ह घोषणा बार्शी तालुक्यातील वैराग येथील मराठा समन्वयक डॉ. कपिल कोरके यांनी केली आहे.वाघमारे यांनी मराठा समाजातील मुलींबाबत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर कपिल कोरके यांनी वाघमारे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा मुद्दा आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




