महाराष्ट्र, बिहार, यूपी, राजस्थानसह अनेक राज्यांत आंदोलनाचा वणवा; विद्यार्थी आणि वकील आक्रमक
मुंबई (प्रतिनिधी) : NEET पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशभरातील आंदोलन अधिक तीव्र होत आहे. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून, अनेक ठिकाणी वकील आणि विविध सामाजिक संघटनांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

बिहारमध्ये बक्सर, वैशाली, समस्तीपूर आणि मधुबनी येथे विद्यार्थ्यांनी पोस्टर आणि बॅनर घेऊन मोर्चे काढले. पाटण्यात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विधानसभा परिसर आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राजस्थानमध्ये जयपूर आणि जोधपूर येथे आंदोलनाला वेग आला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या जयपूर खंडपीठासमोर वकिलांनी धरणे आंदोलन केले, तर राजस्थान विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच आहे. जोधपूरमध्ये आंदोलनादरम्यान कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये वकिलांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. मेरठ, कानपूर आणि लखीमपूरमध्येही विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले. काही ठिकाणी प्रतीकात्मक आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यात आली.
उत्तराखंडमध्ये डेहराडून, हल्द्वानी आणि अल्मोरा येथे विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संस्थांनी निदर्शने केली. हल्द्वानीमध्ये प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याच्या प्रयत्नादरम्यान पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याची माहिती आहे.
हरियाणात रोहतक, हिसार, भिवानी, पंचकुला आणि यमुनानगर येथे वकिलांनी आणि विविध संघटनांनी आंदोलन केले. अनेक कलाकार, खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, जंतर-मंतरवरील आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.




