शिवाजी पार्कवरील आंदोलनात आदित्य ठाकरेंचा अभिजित दिपकेंना फोन; 'राजीनामा घेतल्याशिवाय माघार नाही'
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आज NEET पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण एकत्र आले. आंदोलनादरम्यान उपस्थितांनी हातात तिरंगा घेऊन राष्ट्रगीत गायले. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शर्मिला ठाकरे, तुषार गांधी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी फोनद्वारे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्याशी संवाद साधला. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिल्याबद्दल दिपके यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आभार मानले.
अभिजित दिपके यांनी सांगितले की, सीजेपीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन तीन प्रमुख मागण्या मांडल्या असून, त्यामध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वात महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी आणि सीजेपी या भूमिकेवर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.
संवादादरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले की, व्यवस्था बदलण्यासाठी जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय हा लढा थांबणार नाही. "हा नवा भारत आहे, आम्ही झुकणार नाही,"असेही त्यांनी म्हटले.दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही उपस्थितांना संबोधित करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करत त्यांनी,"सरकारच्या हातात लाठी असेल, पण आमच्या हातात तिरंगा आहे. आता तिरंगा जिंकतो की हुकूमशाही, हे देश पाहील," असे वक्तव्य केले.
आदित्य ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याचा उल्लेख करत, आंदोलन मात्र अद्याप सुरू असल्याचे सांगितले. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज संपूर्ण देशापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करत, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली.




