रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला; अखेर 2 नावांची घोषणा
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शासनाकडून आज दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे, तर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

महायुतीमधील तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये आपापल्या जिल्ह्यात वर्चस्व आणि निधीवरील नियंत्रणासाठी चुरस होती. त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्यांवर स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता अखेर या दोन्ही जिल्ह्यांचा तिढा सुटला आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये रस्सीखेच सुरू होती. मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले हे दोघेही या पदासाठी इच्छुक होते. अखेर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
तर नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये चुरस होती. मात्र, अखेर गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय आणि शासकीय ठिकाणी मुख्य ध्वजारोहण करण्यात आले होते. तर रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
"पांडुरंग पावला... मी दर्शन घेत असताना बायकोने हळूच कानात मी नाशिकचा पालकमंत्री झाल्याची बातमी सांगितली. आज पत्नी आणि मतदारसंघातील 15 ते 16 हजार मतदारांसह पंढरपूरच्या दर्शनासाठी आलो होतो. दर्शन घेतानाच ही बातमी कळली आणि खूप आनंद झाला. आता यंदाचा महाकुंभ न भूतो न भविष्य, असा होईल. नाशिकचा चेहरा-मोहरा बदलून जाईल," अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमीचे मंत्री भरत गोगावले हे महाराष्ट्रातील प्रमुख राजकारणी असून महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. ते 2009 पासून सलग तीन वेळा महाडमधून निवडून आले आहेत. आक्रमक आणि स्पष्टवक्ता नेता म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे.
गिरीश महाजन हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकारणी आहेत. पक्षात त्यांची ओळख संकटमोचक नेता म्हणून आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघातून ते सलग सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. महायुती सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री असून, आता त्यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारीही सांभाळली आहे.




