'भंडारा म्हणजे शुद्ध हळद' घोषणेची मागणी, मुंढेंचं आश्वासन

'भंडारा म्हणजे शुद्ध हळद' घोषणेची मागणी, मुंढेंचं आश्वासन

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील तमाम जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या जेजुरी गडासह राज्यातील विविध प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त आणि केमिकलयुक्त भंडाऱ्याची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर समस्येकडे आणि भाविकांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधत भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे  यांची भेट घेऊन त्यांना एक विशेष निवेदन दिले आहे. "भंडारा म्हणजे शुद्ध हळद" म्हणून जाहीर करा, अशी मागणी आमदार पाचपुते यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

सध्या अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) 'भंडारा' म्हणजे नेमकं काय, याची कोणतीही ठोस किंवा कायदेशीर व्याख्या स्पष्ट नाही. कायद्यात भंडारा म्हणजे 'हळदच' असे कुठेही नमूद न केल्याचा गैरफायदा काही ठराविक लोक घेत आहेत. व्यावसायिक देवस्थान परिसरात रासायनिक रंग आणि ज्वलनशील रसायने मिसळलेल्या भंडाऱ्याची सर्रास विक्री करत आहेत. एफडीएकडे अधिकृत व्याख्या नसल्यामुळे अशा भेसळ करणाऱ्यांवर आणि बनावट भंडारा विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करताना प्रशासनाला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नुकतीच खंडोबाचे मुख्य तीर्थक्षेत्र असलेल्या जेजुरी गडावर भंडाऱ्याला अचानक आग लागल्याची एक अत्यंत खळबळजनक घटना घडली होती. या घटनेचा दाखला देत आमदार पाचपुते यांनी भंडाऱ्यातील रासायनिक भेसळीवर बोट ठेवले. केमिकलयुक्त भंडारा शरीरात गेल्याने भाविकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार विक्रम पाचपुते म्हणाले की, "मी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. अनेक खंडोबाच्या मंदिरात हळदीचा भंडारा म्हणून वापर केला जातो. मात्र अलीकडच्या काळात या भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणावर मिश्रण (भेसळ) केले जात आहे. याचा थेट तोटा निष्पाप भाविकांना होत असून आमच्या धार्मिक श्रद्धेवरही याचा वाईट परिणाम होत आहे."

ते पुढे म्हणाले, "या संदर्भात आमच्या वेळोवेळी बैठका झालेल्या आहेत. भंडाऱ्याची ज्या वेळेस गडावर उधळण केली जाते, त्या वेळेस तो उडणारा भंडारा आपल्या श्वासातून शरीरात जातो. पूर्वीपासून भंडारा म्हणून शुद्ध हळदच विकली जात होती आणि पुढेही हळदच भंडारा म्हणून विकली गेली पाहिजे, या मानसिकतेचे आम्ही सर्वजण आहोत. म्हणूनच लवकरात लवकर 'भंडारा म्हणजे हळदच' हे कायद्यामध्ये नमूद करणे अत्यंत गरजेचे आहे."