शिर्डीत FDA ची पुन्हा मोठी कारवाई; 500 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त
मुंबई (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्नसुरक्षा आणि भेसळविरोधी मोहिमेला वेग आला आहे. गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ तसेच निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर सातत्याने कारवाई केली जात असल्याने अनेक ठिकाणी नियमभंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

याच पार्श्वभूमीवर FDA ने शिर्डीत पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. साई मंदिर परिसरातील खासगी पेढा विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे टाकत 500 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचा पेढा जप्त करण्यात आला आहे. आज सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईमुळे पेढा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी शिर्डीत विक्रीस ठेवण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांचा प्रकार समोर आला होता. भाविकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत पुन्हा एकदा मोठे धाडसत्र राबवले आहे. FDA च्या या कारवाईमुळे अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अधिक दक्षता घेतली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.




