माझगावमध्ये गणपती आगमनावेळी दोन गटात तणाव; अंडी फेकल्याच्या आरोपानंतर गुन्हा दाखल

माझगावमध्ये गणपती आगमनावेळी दोन गटात तणाव; अंडी फेकल्याच्या आरोपानंतर गुन्हा दाखल

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील माझगावमध्ये गणपती आगमन सोहळ्यादरम्यान अंडी फेकण्यात आल्याच्या आरोपानंतर दोन गटात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गणेश मंडळाचे कार्यकर्ते, तरुण आणि गणेशभक्तांनी रात्री आंदोलन करत निषेध व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. मध्यरात्री 3 वाजेपर्यंत माझगाव परिसरात तणावाचं वातावरण होतं.

‘माझगावचा मोरया’ गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यादरम्यान अंडी फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. गणेश मंडळ आणि भक्तांकडून कॉन्टिनेन्टल हाइट्स या इमारतीतून अंडी फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अंडी नेमकी कोणी आणि कुठून फेकली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

घटनास्थळाच्या परिसरात तीन ते चार मोठ्या इमारती असल्याने नेमक्या कोणत्या इमारतीमधून अंडी फेकण्यात आली, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही.

पोलिसांच्या डिटेक्शन टीमकडून परिसरातील इमारतींमध्ये जाऊन चौकशी केली जात आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी सुरू आहे. अंडी नेमकी कुठून आणि कोणी फेकली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

यंदा गणेशोत्सव 14 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मुंबईत सुमारे 10,600 सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यापैकी केवळ 2,500 मंडळांनी 10 दिवसांच्या उत्सवासाठी परवानगी घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 28 लाख गणेश मूर्तींची स्थापना होण्याचा अंदाज आहे.

मुंबईत गणेश मंडळांच्या परवानगीसाठी ऑनलाइन सिंगल-विंडो प्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामध्ये बीएमसीसोबत स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांची एनओसीही ऑनलाइन मिळू शकणार आहे. परवानगीसाठी अर्ज 13 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे.