सरकारने पुन्हा डाव टाकला तर पुढचं आंदोलन मुंबईत, वर्षावर; मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम

सरकारने पुन्हा डाव टाकला तर पुढचं आंदोलन मुंबईत, वर्षावर; मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम

मुंबई (प्रतिनिधी)शिष्टमंडळ आणि सरकार किती दिवस चर्चा करणार? सरकार चर्चा करतं आणि अवमानही करतंय. तुम्हाला अजून मराठा समाजाकडून काय अपेक्षित आहे? 58 लाख नोंदी देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आम्ही मराठ्यांना वेड्यात काढतो, हा सरकारचा गैरसमज आहे. शिष्टमंडळ आणि सरकारने या गैरसमजातून बाहेर पडावं. आता आम्ही वेळ देण्याच्या मनस्थितीत नाही, असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

29 ऑगस्टला आंदोलन करणारच, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. अंतरवालीच्या आंदोलनावेळी सरकारने डाव टाकला, पण आता 29 ऑगस्टच्या आंदोलनात तसं केलं तर पुढचं आंदोलन मुंबईत आणि वर्षा बंगल्यावर असेल, असा इशारा त्यांनी दिला. फडणवीस यांना विरोध करणार नाही. खोलीत अडचण होत असेल तर स्लॅबवर बसून आंदोलन करू, असंही ते म्हणाले.

आमचं पहिल्यापासूनच म्हणणं होतं की, 32 टक्के आरक्षणातून आम्ही आरक्षण मागितलं तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं. विनाकारण मराठ्यांशी वाद करून काही फायदा नाही. छगन भुजबळ आता म्हातारपणात शहाणे झाले आहेत. ते आता चांगले हसत आहेत. त्यांना एवढं हसताना महाराष्ट्राने याआधी कधी पाहिलं नाही, अशी बोचरी टीकाही जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर केली.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावरही जरांगे पाटील यांनी टीका केली. तुमच्या डोक्यातला खटका सुरू आहे. तुम्ही कोणत्या ओबीसींचं कल्याण होऊ दिलं? आरक्षणामुळे कोणता ओबीसी मोठा झाला? पोळी भाजण्यासाठी हे नेत्यांच्या दारात फिरतात. ओबीसींनाही हे मान्य नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, ओबीसी नेत्यांना आव्हान देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका. मराठ्यांच्या नादाला लागून तुमचं राजकीय करिअर उध्वस्त करू नका. मंत्री आणि आमदार झाल्यानंतर मराठ्यांच्या विरोधात काम करू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

सगळ्या जाती-धर्मातील बांधवांना सांगतो की, कोणाचं आरक्षण गेलं आणि कोणाचं आलं, या भानगडीत पडू नका. राजकारणापेक्षा शिक्षणामुळे मराठा आणि धनगर समाजाचं भलं होणार आहे. धनगरांनीही उगाच विकतच्या भांडणात पडू नये, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.

छगन भुजबळ आता सगळे दात दिसतील एवढं हसत आहेत. त्यांना आता कायदा कळतोय, सगळं कळतंय. मराठ्यांना धरून राहण्यात काय हरकत आहे? 29 ऑगस्टच्या अंतरवाली आंदोलनातही सरकारने डाव टाकला, तर मुंबई आणि वर्षा आपल्या सगळ्यांची आहे. फडणवीस यांना विरोध करणार नाही. खोलीत अडचण होत असेल तर स्लॅबवर बसून आंदोलन करू, असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं.

मराठ्यांचा नोंदी देऊन सन्मान करणं हे सरकारचं काम आहे. नोंदी दिल्या नाहीत तर सरकारला आम्ही नीट करू शकतो. राज्यात कुणीही खूश नाही. आम्ही सरकारला नीट करू, असा इशाराही त्यांनी दिला.

मी प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी काम करत आहे आणि समाज माझ्यासोबत आहे. मागण्या मान्य केल्या तर ठीक, अन्यथा सरकारची मस्ती उतरवू. गेल्या तीन वर्षांत सरकारने घेतलेली मजा आता विसरू नका, असा इशारा त्यांनी दिला. आश्वासनं ऐकून कंटाळा आला आहे. 28 ऑगस्टपर्यंत सर्व मागण्यांची अंमलबजावणी करा. सरकारने गैरसमजातून बाहेर यावं. या लढाईत मराठे 100 टक्के जिंकणार, अन्यथा मी उपोषण करून मरणार, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.