जैन समाजाची माफी! शिवरायांच्या जिरेटोप प्रकरणावर अखेर पडदा; 'मराठी अस्मितेचा आदर राखलाच पाहिजे
मुंबई (प्रतिनिधी) : मालाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याच्या घटनेवरून निर्माण झालेला वाद आता अखेर शांत झाल्याचं चित्र आहे.या प्रकरणानंतर मालाडमधील जैन समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल लेखी माफीनामा सादर करत दिलगिरी व्यक्त केली.

राज ठाकरे यांनीही जैन समाजाच्या प्रतिनिधींना स्पष्ट शब्दांत सांगितलं की, महाराष्ट्रात मराठी अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीकांचा सन्मान राखला गेला पाहिजे. कोणत्याही कारणामुळे समाजात तणाव निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असं त्यांनी नमूद केलं.
याचवेळी मुंबईतील काही भागांमध्ये मराठी फलकांवर पांढरे पट्टे मारण्याच्या घटनांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारांमुळे मराठी आणि जैन समाजामध्ये विनाकारण वाद निर्माण होत असून, हे प्रकार तात्काळ थांबले पाहिजेत, असा इशाराही त्यांनी दिला.
जैन समाजाच्या प्रतिनिधींनी आपल्या बाजूने स्पष्ट केलं की, कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा अपमान करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता. भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत आणि सामाजिक सलोखा कायम राखला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.या भेटीनंतर मालाडमधील जिरेटोप वादावर पडदा पडल्याचं मानलं जात असून, मराठी अस्मितेबाबत मनसेची भूमिका पुन्हा एकदा ठामपणे समोर आली आहे.




