VIP दर्शनावर कडक निर्बंध; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा स्पष्ट इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी VIP दर्शनाबाबत अत्यंत ठाम भूमिका मांडली आहे. त्यांच्या मते, आषाढीच्या काळात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांपेक्षा कुणीही मोठा नाही. त्यामुळे VIP दर्शनामुळे सर्वसामान्य भाविकांना त्रास होणार असेल, तर अशा दर्शनाला कोणतीही मुभा दिली जाणार नाही.

मुख्यमंत्र्यांच्या स्पष्ट सूचनांनुसार, मंत्री, आमदार, खासदार आणि इतर मान्यवरांनी VIP दर्शनाचा आग्रह न धरता केवळ मुखदर्शन घ्यावे, असे आवाहनही जयकुमार गोरे यांनी केले आहे. वारकऱ्यांचा वेळ वाचवणे आणि त्यांना विनाअडथळा दर्शन मिळणे हीच खरी विठ्ठल सेवा असल्याचे त्यांनी सांगितले.
VIP भाविकांसाठी अल्प वेळात मुखदर्शनाची व्यवस्था केली जाणार असली, तरी सर्वसामान्य वारकऱ्यांना अडथळा निर्माण होईल असे कोणतेही विशेष दर्शन दिले जाणार नाही. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि मंदिर समितीला स्पष्ट सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
मंदिरातील काही कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाची दखल घेत त्यांच्या विरोधात कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच VIP दर्शनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिला.मुख्यमंत्र्यांच्या VIP दर्शन बंदीच्या निर्णयाचे वारकरी संप्रदायातून स्वागत होत असून, यामुळे दर्शन रांगेतील प्रतीक्षेचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी झाल्याचेही जयकुमार गोरे यांनी सांगितले.




