डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का! शेकडो महिला कार्यकर्त्यांची मनसेत घरवापसी; रवींद्र चव्हाणांच्या बालेकिल्ल्यातच पक्षप्रवेश
मुंबई (प्रतिनिधी) : डोंबिवलीत भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या काही महिला कार्यकर्त्यांनी पुन्हा मनसेत घरवापसी केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत भाजपच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनीही मनसेत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रभागात आणि त्यांच्या राहत्या घराच्या अगदी जवळ असलेल्या मनसे नेते राजू पाटील यांच्या कार्यालयात पार पडला.

यावेळी राजू पाटील यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्वागत करत भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. "घाबरण्याची गरज नाही, आपण रवींद्र चव्हाण यांच्या घराशेजारीच पक्षप्रवेश करत आहोत," असं म्हणत त्यांनी टोला लगावला. दरम्यान, पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना राजू पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली. "हे फटाके रवींद्र चव्हाण यांनी वाजवले का?" असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरातील मनसे कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विधानसभा निवडणुकीत मनसेमधून भाजपमध्ये गेलेल्या काही महिला कार्यकर्त्या पुन्हा मनसेत परतल्या. त्यांच्यासोबत भाजपमधील शेकडो महिला कार्यकर्त्यांनीही मनसेत प्रवेश केला. यावेळी मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी घरवापसी करणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं.
काही लोक निवडणुकीच्या काळात पक्ष सोडून जातात. निवडणूक हा राजकारणातील एक उत्सव असतो. त्यात छोटे-मोठे वाद होतात, कधी कार्यकर्त्यांचा मान-सन्मान राखला जात नाही आणि नाराजीतून काही जण पक्ष सोडतात, असं राजू पाटील यांनी सांगितलं. मात्र, केवळ पैशासाठी पक्ष सोडून गेलेल्यांना मनसेत प्रवेश दिला जाणार नाही. जे भावनेतून किंवा नाराजीतून पक्षाबाहेर गेले होते, त्यांचं मनसेत मोठ्या मनाने स्वागत केलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
काही कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचं माझ्या कानावर आलं आहे. मात्र घाबरण्याची गरज नाही. आपण भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या घराच्या शेजारीच पक्षप्रवेश करत आहोत, मग घाबरण्याचं कारण काय? हा लोकशाहीतील मतांचा विषय आहे, असं राजू पाटील म्हणाले. भाजपमधून मनसेत आलेल्या महिला आणि इतर पक्षांतून आलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. त्यांना पक्षात योग्य जबाबदाऱ्या दिल्या जातील. भाजपमध्ये ज्या पद्धतीने महिलांना संघटनात्मक कामाची सवय आहे, त्याचप्रमाणे मनसेतही त्यांना संधी दिली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
दरम्यान, फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना "अरे, हे फटाके रवींद्र चव्हाण यांनी वाजवले का?" अशी मिश्किल टिप्पणीही राजू पाटील यांनी केली. या पक्षप्रवेशावेळी मनसे शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनीही भाजपवर निशाणा साधला. प्रभाग क्रमांक 31 मधील काही महिलांना दबाव टाकून भाजपमध्ये नेण्यात आलं होतं, असा दावा त्यांनी केला. मात्र या महिला स्वतःहून पुन्हा मनसेत परतल्याचं त्यांनी सांगितलं.
या महिला एकट्या परतल्या नाहीत. एकाच प्रभागातील चार महिलांसोबत तब्बल 75 ते 80 महिला आणि अनेक कार्यकर्ते मनसेत दाखल झाल्याचं हर्षद पाटील यांनी सांगितलं. "आमच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला, तर मनसे ते खपवून घेणार नाही. आजची घटना ही फक्त झलक आहे, येत्या काळात आम्ही दाखवून देऊ," असा इशाराही हर्षद पाटील यांनी दिला. विशेष म्हणजे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रभागात आणि त्यांच्या राहत्या घराजवळच महिला कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याने डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.




