RSS वर मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचं मोठं वक्तव्य! 'अनेक अधिकारी म्हणतात, आम्हीही संघाची चड्डी घातलीय

RSS वर मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचं मोठं वक्तव्य! 'अनेक अधिकारी म्हणतात, आम्हीही संघाची चड्डी घातलीय

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य प्रदेशचे नगरविकास मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भोपाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दावा केला की, भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक सरकारी अधिकारी स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडत असल्याचं सांगू लागले आहेत.

यावेळी त्यांनी, "अनेक अधिकारी म्हणतात, मीही RSS ची चड्डी घातली आहे. आमचे वडील शाखेत जात होते, पण आधी कोणी सांगत नव्हतं,"असं वक्तव्य केलं. त्याचबरोबर संघाचा विस्तार वेगाने होत असला तरी चांगल्या कार्यकर्त्यांची कमतरता जाणवत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारी अधिकारी आणि संघ यांच्यातील संबंधांवरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एका हिंदू समाज संमेलनात RSS आणि संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या कार्याचा गौरव केल्याचा व्हिडिओ अलीकडेच व्हायरल झाला होता. त्यानंतर काँग्रेसने टीका केली, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला.राज ठाकरे यांनी, "संघाबद्दल एवढीच आस्था असेल तर पोलीस सेवेचा राजीनामा देऊन संघ किंवा भाजपमध्ये प्रवेश करा," असा टोला लगावला. या सर्व घडामोडींमुळे सरकारी अधिकाऱ्यांची राजकीय तटस्थता आणि सार्वजनिक भूमिका यावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.