कुत्रा-मांजर उभं केलं तरी जिंकू’ हा अहंकार जनतेने मोडला; बांकीपूर निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई (प्रतिनिधी) : बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला जिंकत मोठा राजकीय धक्का दिला आहे. या निकालानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

बांकीपूर हा गेली अनेक वर्षे भाजपचा अभेद्य गड मानला जात होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी या मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळवला होता. त्याआधी त्यांच्या वडिलांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी हा गड जिंकत सर्वांचं लक्ष वेधलं.
यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, बांकीपूरमध्ये भाजपचा पराभव हा त्यांच्या अहंकाराला मिळालेला धक्का आहे. प्रचारादरम्यान भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी, भाजपने कुत्रा किंवा मांजर उभं केलं तरी ते जिंकून येईल, असं वक्तव्य केल्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले, हा अहंकार जनतेने मतपेटीतून मोडून काढला.
याशिवाय, मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीचा उल्लेख करत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. हा एखादा मोठा राजकीय बदल नसला, तरी जनतेचा कल स्पष्ट दिसू लागला आहे. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याचं हे संकेत आहेत, असं ते म्हणाले.
राऊत यांनी पुढे दावा केला की, 1995 पासून भाजपच्या ताब्यात असलेला गड टिकवता आला नाही, म्हणजे मतदारांनी नव्या पर्यायाला पसंती दिली आहे. तसेच बिहारच्या नेतृत्वावरही त्यांनी टीका करत भाजपच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.




