श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियासमोर कसोटीचे मोठे आव्हान

श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियासमोर कसोटीचे मोठे आव्हान

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघ इंग्लंडविरुद्धची मालिका पूर्ण केल्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार असून तेथे तीन टी-20 सामने खेळणार आहे. त्यानंतर ऑगस्ट 2026 मध्ये टीम इंडिया दोन सामन्यांच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. श्रीलंका क्रिकेटने या मालिकेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे.

झिम्बाब्वे दौरा 26 जुलै रोजी संपल्यानंतर भारतीय संघ 15 ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेला सुरुवात करेल. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) 2025-27 स्पर्धेचा भाग असल्याने दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.भारतीय संघ यापूर्वी दोन वेळा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला असला, तरी विजेतेपद पटकावण्यात अपयशी ठरला आहे. सध्या गुणतालिकेत भारत पाचव्या, तर श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक सामना WTCच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नुकतीच इंग्लंडविरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली, तर त्यानंतर घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकत आत्मविश्वास वाढवला आहे. मात्र, फिरकीला अनुकूल असलेल्या श्रीलंकेतील खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांची खरी कसोटी लागण्याची शक्यता आहे. विशेषतः गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या पराभवानंतर भारताच्या फिरकीविरुद्धच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित झाले होते.भारताने 2017 मध्ये श्रीलंकेच्या कसोटी दौऱ्यात 3-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाच्या मालिकेतही चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक :

पहिली कसोटी :15 ते 19 ऑगस्ट 2026 – गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

दुसरी कसोटी : 23 ते 27 ऑगस्ट 2026 – एसएससी, कोलंबो

दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 10.00 वाजता सुरू होतील, तर नाणेफेक सकाळी 9.30 वाजता होईल.